पुणे- सध्या घोंगावत असलेल्या चक्रीवादळाला घाबरू नका, काळजी घ्या, असे म्हणत काही सूचना एनडीआरएफचे डेप्युटी कमांडन्ट सच्चिदानंद गावडे यांनी केल्या आहेत.
माहिती देताना एनडीआरएफचे उपप्रमुख सच्चिदानंद गावडे सध्या अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे निसर्ग हे चक्रीवादळ कोकण किनापट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीवर एनडीआरएफच्या 20 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर रत्नागिरीतून सुमारे तीन हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे डेप्युटी कमांडन्ट सच्चिदानंद गावडे यांनी काळजी घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. ते म्हणाले, नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये, केवळ शासकीय सूचनांचे पालन करावे. या वादळाला न घाबरता आपली व परिवाराची काळजी घ्यावी. पाऊस पडताना कोणीही जीर्ण इमारत, जुने घरे किंवा इमारत, जीर्ण झाडाखाली किंवा विजेच्या खांबाजवळ थांबू नये. आपले महत्त्वाचे वस्तू किंवा कागदपत्रे भिजणार नाही, याची काळजी घ्यावी व ते उंच ठिकाणी ठेवावीत. तुम्हाला जर शेल्टर होममध्ये हलविण्यात येत असेल तर महत्त्वाची कागदपत्रे स्वतःजवळ ठेवावीत. कोणी आजारी असेल तर, त्यांच्यासाठी मुबलक औषधसाठा ठेवावा. पाऊस किंवा वारा थांबल्यानंतर शासनाकडून सूचना मिळेपर्यंत घराबाहेर पडण्याची घाई करू नये, असेही ते म्हणाले.
हेही वाचा -Live Update 'निसर्ग': मुंबईतून विमानसेवा रद्द, कोकण किनार पट्टीवरील हजारो नागरिकांना केले स्थलांतरीत