पुणे - खासगी सावकारकीच्या माध्यमातून कोणी गोरगरिबांना लुटत असेल तर त्याच्यावर तडीपार, मोका सारखी कारवाई करेन. कोणी मोठ्या बापाचा असू द्या, कारवाईनंतर कुठला मायचा लाल चुकले म्हणून माझ्याकडे आला तरी सोडणार नाही, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासगी सावकारांना भरला.
हेही वाचा -काँग्रेस अध्यक्ष पद.. सुशीलकुमार शिंदे म्हणतात, 'बाजारात तुरी आणि कशाला मारामारी'
बारामती येथील जिजाऊ भवन येथे बारामती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक श्रीनिवास बहूळकर यांचा सेवापूर्तीनिमित्त सन्मान करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले, मधल्या काळामध्ये खासगी सावकारीची प्रकरणे व त्यामधून झालेल्या आत्महत्या माझ्या कानी आल्या होत्या. नियमबाह्य व कायदे मोडून व्यवसाय करण्यापेक्षा चांगला व्यवसाय करा. अशा धंद्यांपासून बाजूला रहा. दादागिरी, मनगटशाहीच्या जोरावर कोणी सर्वसामान्य माणसाला लुटत असेल, तर त्याच्यावर कायद्याने जेवढी कडक कारवाई करता येईल तेवढी कडक कारवाई करण्यात येईल. मग तो कोणी का असेना, माफी मागत आला तरी त्याला माफ करणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहर व तालुक्यातील खासगी सावकारांना गर्भित इशारा दिला.
केंद्राकडून सहकार क्षेत्र अडचणीत आणण्याचा प्रयत्न..
अंतरराष्ट्रीय बाजारात २ हजार १०० रुपये साखरेचा दर झाला आहे. मात्र, सध्या साखर विकली जात नाही. आरबीआयच्या माध्यमातून केंद्र सरकार सहकार क्षेत्रासमोर वेगवेगळ्या अडचणी निर्माण करीत आहे. सहकारावर बंधने आणली जात आहे. सहकार चळवळ मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याबाबत शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली आहे. यामधून मार्ग काढण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले.