महाराष्ट्र

maharashtra

लोकांचे जीव वाचवण्यासाठी कोरोना साखळी तोडणे गरजेचे; उपमुख्यमंत्री अजित पवार

By

Published : Apr 10, 2021, 3:46 PM IST

बारामती शहर आणि तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका. कोरोनाची साखळी तोडली तरच अनेकांचे जीव वाचणार आहेत. त्यामुळे हा विषय सर्वांनी गांभीर्याने घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (शनिवारी) बारामती येथे केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती- प्रशासनाने अनेक उपाययोजना करूनही बारामती शहर आणि तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका. कोरोनाची साखळी तोडली तरच अनेकांचे जीव वाचणार आहेत. त्यामुळे हा विषय सर्वांनी गांभीर्याने घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (शनिवारी) बारामती येथे केले. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात 'कोरोना विषाणू निर्मूलन आढावा बैठक' उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते.

रूग्णांना तात्काळ बेड उपलब्ध करून द्यावे

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सद्यस्थितीत बारामती तालुक्यात शासन आणि प्रशासन यांच्या मार्फत विविध उपाययोजना करून देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही बाब चिंतेची असून कोरोना साखळी तोडण्याचा विषय सर्वांनी गांर्भियाने घेणे आवश्यक आहे. बारामती तालुक्यातील प्रत्येक रूग्णालयाचे फायर ऑडीट प्राधान्याने करून घेण्यात यावे. प्रशासनाने याबाबत खबरदारी घ्यावी, असेही ते म्हणाले. सांगली जिल्ह्यात जसे मोबाईल कोरोना चाचणी व्हॅन प्रत्येक गावात जावून नागरिकांची कोरोनाची तपासणी केली जाते, त्याच धर्तीवर बारामती तालुक्यातही मोबाईल व्हॅन द्वारे कोरोना तपासणी करण्यात यावी. रूग्णांना कोणताही भेदभाव न ठेवता तात्काळ बेड उपलब्ध करून देण्यात यावे.

लसीकरणाचा वेग वाढवावा

बारामती तालुक्यातील वृध्दाश्रमामध्ये जावून तेथील वृध्दांची व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात यावी. आरोग्य सेवेकरीता मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यास शिक्षकांच्या सेवा घेण्यात याव्यात. कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधनसामुग्री याची कमतरता भासल्यास औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांची मदत घ्यावी. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर निर्बंध लावले असतानादेखील नागरिकांकडून निर्बंधांचे पालन केले जात नाही, हे योग्य नाही. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. जे नागरिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत नाहीत, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. लसीकरणाचा वेग वाढवावा. सॅनिटायझरचा तसेच मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर राखावे व प्रशासनास सहकार्य करावे, असेही ते यावेळी म्हणाले.

शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर चालू करावे

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बारामती येथील पदाधिकारी, वैद्यकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. आयुष प्रसाद म्हणाले, ज्या भागामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव जास्त आहे त्याठिकाणी कडक निर्बंध करावेत. आरोग्य विभागामध्ये भरतीप्रक्रीया सुरू करण्यात आली असून मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही. भरतीप्रक्रीया पूर्ण होईपर्यंत खासगी रूग्णालयामधून करार पध्दतीने मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यात यावे. कोरोना रूग्णांचे एक्स-रे करणे आवश्यक आहे. औषधांची कमतरता भासू देणार नाही. सर्व कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावे. जिल्हा परिषदेने बेड मॅनेजमेंटसाठी ॲप तयार केले आहे त्याचा वापर करावा. सुपर स्प्रेड गावनिहाय यादी करावी. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे. शाळांमध्ये क्कारंटाईन सेंटर चालू करण्यात यावेत, इत्यादी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती शहरासह तालुक्यातील कोरोनाची सद्यस्थिती व कोरोना आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबतची माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details