महाराष्ट्र

maharashtra

पुणे जिल्ह्यात टाळेबंदी नाही, मात्र नियमांची कडक अंमलबजावणी - उपमुख्यमंत्री

By

Published : Feb 21, 2021, 3:07 PM IST

Updated : Feb 21, 2021, 8:53 PM IST

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात सोमवार दिनांक 22 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. पुण्यातील कौन्सिल सभागृह येथे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.

पुणे कोरोना
पुणे

पुणे- जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येतील. रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत नियंत्रित संचार राहील, याची अंमलबजावणी करा. गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी 200 व्यक्तींच्या मर्यादेत लग्न समारंभ होतील, याची दक्षता घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात सोमवार दिनांक 22 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. पुण्यातील कौन्सिल सभागृह येथे पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. कोरोना विषाणूची सद्यस्थिती व प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत, तसेच लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर आवश्यक ते उपाय सुचवून त्यांची तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

प्रादुर्भाव रोखण्याकरिता सूक्ष्म नियोजन करा

पवार म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करा. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सूक्ष्म नियोजन करा. शहर व ग्रामीण भागात 'हॉटस्पॉट'निहाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवा. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावी उपाययोजना राबवा. संपर्क, शोधमोहीम (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) अधिक प्रभावीपणे राबवा. शासकीय आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करून नमुना तपासण्या वाढवा. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सुपर स्प्रेडर व सारी रुग्णांचे सर्वेक्षण करा, असे सांगून कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होऊन संसर्ग रोखण्यात खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी त्यांनी फ्ल्यू सदृश्य रुग्णांची तपासणी करून घ्यावी, असेही सांगितले.

जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

पवार म्हणाले, 200 व्यक्तींच्या मर्यादेत लग्न, कौटुंबिक व राजकीय कार्यक्रम होतील याची दक्षता घ्या. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवावीत. मात्र, अभ्यासिका निम्या क्षमतेने नियम पाळून सुरू राहतील याची खात्री करा. हॉटेल, बार रात्री ११ पर्यंतच सुरू राहतील याची दक्षता घ्या, असे सांगून रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान नियंत्रित संचाराची अंमलबजावणी करा. वृत्तपत्र, दूध, भाजीपाला, फळे, औषधे या अत्यावश्यक सेवांना सूट द्या. जिल्ह्यात सर्वत्र कोविड केअर सेंटर तत्काळ सुरू करा. मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. आरोग्य व्यवस्था सक्षम होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना गतीने करा, असे सांगून ससून रुग्णालयाला आवश्यक मनुष्यबळ व यंत्र सामुग्री पुरविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Last Updated : Feb 21, 2021, 8:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details