महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 11, 2020, 3:09 PM IST

ETV Bharat / state

'जम्बो हॉस्पिटल'बाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत - अजित पवार

पुण्यातील जम्बो कोरोना रुग्णालयाबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक तक्रारी समोर येत आहेत. येथील परिस्थिती ठीक नसल्याचे काही दिवसांपूर्वी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कबूल केले होते. विविध तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दम भरला.

उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे - 'जम्बो हॉस्पिटल'बाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी येथील परिस्थिती आणि व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे. जम्बो रुग्णालयाबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत. येथील खाटांच्या उपलब्धतेची माहिती पोहोचवण्यात व उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे स्‍पष्‍ट निर्देश उपमुख्यमंत्री आणि जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

पुण्यातील विधानभवन सभागृहात शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थितीबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त कृष्‍णप्रकाश, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -पुण्यातील आरोग्य व्यवस्था 'व्हेंटिलेटर'वर, 'ऑक्सिजन'अन् खाटांच्या कमतरतेने कोरोनाग्रस्तांचे हाल

पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. संपूर्ण महाराष्ट्रातून पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी कोरोनाबाधित रुग्ण दाखल होत आहेत. कोरोनाच्या रुग्णांना वेळेत व योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणेने पूर्ण ताकदीनिशी काम करावे. कोरोना परिस्थती नियंत्रणासाठी राज्य शासन सर्व प्रकारे मदत करत असून दोन्ही महापालिकेच्या आरोग्य विभागाने देखील सक्रियपणे काम करावे.

पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी विभागीय आयुक्तांनी नियोजनबध्द कार्यवाही करावी. विभागातील पाचही जिल्ह्यात कोरोनाविषयक काम करताना एकाच अधिकाऱ्यावर कामाचा ताण येऊ नये. तसेच कामात गतीमानता येण्याच्या दृष्टीने विषयनिहाय जबाबदाऱ्या सोपवून कामाचे विकेंद्रीकरण करावे, असे त्‍यांनी सांगितले.

हेही वाचा -पिंपरी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पीपीई किट परिधान करून कोविड केंद्रात, रुग्णांची केली विचारपूस

विभागातील कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागू नये, यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. ऑक्सिजन टँकरचा वाहतुकीदरम्यानचा वेळ वाचवण्यासाठी तसेच रुग्णालयात जलदगतीने ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी ऑक्सिजन टँकरला रुग्णवाहिकेप्रमाणे भोंग्याची व्यवस्था करून घ्यावी. तसेच पोलीस विभागाने ऑक्सिजन टँकर मार्गस्थ होण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून हे टँकर वाहतूक कोंडीतून जलदगतीने बाहेर पडतील, अशा सूचना त्यांनी केल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details