बारामती (पुणे)- शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कडक राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कडक राबवा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश - बारामती कोरोना अपडेट
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली येथील विद्या प्रतिष्ठानच्या 'व्हिआयटी' सभागृहात आढावा बैठक पार पडली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली येथील विद्या प्रतिष्ठानच्या 'व्हिआयटी' सभागृहात आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक सचिन सातव आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. भविष्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी देखील अधिक दक्ष राहून गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची काळजी घ्यावी. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून कोरोना प्रार्दुभाव टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच या कालावधीमध्ये येणारे सण, उत्सव साधेपणाने व गर्दी न करता साजरे करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.