बारामती (पुणे)- 'राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना अपघाताने गृहमंत्रिपद मिळाले', असे जाहीरपणे लिखाण करून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत खळबळ उडवून दिली. यावर महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षांचे आहे. त्यामुळे कुणी मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलेच फटकारले आहे. आज बारामतीत अजित पवार यांनी कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतली. त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी संजय राऊत यांना इशारा दिला.
राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे शिवसेनेत कुणाला मंत्रिपद द्यायचे, याचा निर्णय उद्धव ठाकरे घेत असतात. काँग्रेसमध्ये सुद्धा कुणाला मंत्रिपद द्यायचे याचा अधिकार हा सोनिया गांधी यांना आहे आणि राष्ट्रवादीमध्ये 1999 पासून मधली 5 वर्षे वगळता सरकारमध्ये काम करतोय. पवार साहेबांना 50 वर्षांचा राजकीय अनुभव आहे, त्यामुळे कुणाला मंत्रिपद द्यायचे, कुणाला कोणता विभाग द्यायचा, हे राष्ट्रवादीमध्ये तेच ठरवत असतात. विरोधकांनी वक्तव्य केले तर समजू शकतो. पण महाविकास आघाडीमध्ये असताना मान्यवरांनी एकमेकांना अडचणीत आणणारी वक्तव्ये करू नयेत, असे म्हणत अजित पवार यांनी राऊत यांना बजावले.