पुणे -'अण्णा हजारे आपल्या मताशी ठाम असतात. कुठे अन्याय होत असेल, चुका होत असतील तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी त्यांनी आजवर अनेक आंदोलन केली आहेत. तशीच भूमिका त्यांनी आजही मांडली आहे. एकदा त्यांनी ठरवल्यानंतर ते सहसा मागे हटत नाहीत, त्यांच्या मतांशी ते ठाम राहतात, हा आजवरचा अनुभव आहे,' असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते पुण्यात जिल्हा परिषद येथे राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हेही वाचा -पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली तर आश्चर्य वाटून घेऊ नका; पवारांचा टोला
शेती कायद्यांविरोधातील आंदोलनाबद्दल अजित पवार म्हणाले
'दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांच्या रॅलीला एका भागात गालबोट लागले आहे. वास्तविक पाहता शेतकरी इतके महिने शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते. ट्रॅक्टर हे त्यांचे शेतीचे महत्त्वाचे अवजार आहे. त्यामुळे ते ट्रॅक्टर घेऊन गेले होते. खरे पाहता शेतकरी कधीही ही हिंसाचाराचा अवलंब करीत नाहीत. त्यामुळे हा हिंसाचार कशामुळे घडला त्याच्या खोलात गेले पाहिजे. शेतकर्यांच्या आंदोलनाला गालबोट लावून बदनाम करण्याचा प्रयत्न होता का, अशी शंका याठिकाणी निर्माण होते. मी स्वतः शेतकरी आहे, त्यामुळे मला खात्री आहे की शेतकरी हिंसाचाराची भूमिका कधीच घेत नाही. हिंसेच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न शेतकरी कधीच करत नाही. आजपर्यंत अहिंसेच्या मार्गानेच आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला आहे,' असे पवार म्हणाले.