बारामती -राष्ट्रपती पद हे देशातील सर्वोच्च पद आहे. या पदावरील व्यक्तीचा जनतेतील प्रत्यक्ष संपर्क तसा कमी होतो. मात्र शरद पवार यांचे आजवरचे समाजकारण, राजकारण हे प्रत्यक्ष लोकांमध्ये राहून केलेले आहे. त्यांना लोकांमध्ये मिसळणे त्यांचे प्रश्न समजून घेणे, यातून समाधान मिळते. त्यामुळे शरद पवारांनी जनतेत राहून जनतेचे काम करावे, असा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे दिली.
Ajit Pawar Statement : . . म्हणून शरद पवारांना राष्ट्रपती पद नको - उपमुख्यमंत्री अजित पवार - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लेटेस्ट न्यूज
राष्ट्रपती पदावरील व्यक्तीचा जनतेतील प्रत्यक्ष संपर्क तसा कमी होतो. मात्र शरद पवार हे जनतेतील नेते आहेत. लोकांमध्ये काम करण्यात त्यांचा कल असतो. त्यामुळे शरद पवार हे राष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
कोणाकडे 'कौशल्य' आहे ते आगामी निवडणुकीत कळेल -नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी खेळीमुळे भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले. यावर भाष्य करताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फडणवीस यांचे राजकीय कौशल्य वापरून उमेदवार निवडून आणल्याबद्दल कौतुक केले होते. याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, ते म्हणाले की एखाद्या निवडणुकीत ज्यांच्या बाजूने निकाल लागतो. त्यांनी कौशल्याने निवडणूक जिंकली. असे म्हटले जाते तर ज्यांचा निवडणुकीत पराभव होतो. ते कमी पडले असे म्हटले जाते. मात्र आगामी निवडणुकीत कोणाकडे कौशल्य आहे. ते लवकरच जनतेला कळेल, असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.