पुणे - 'राज्यात कोरोना काळात निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य सरकार अहोरात्र प्रयत्न करत आहे. 3 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, केंद्र सरकारने आतापर्यंत कोणत्या राज्यांना किती ऑक्सिजनचा पुरवठा केला, याची माहिती जाहीर करावी', अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
अजित पवार यांच्या उपस्थितीत आज (14 मे) पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना आढावा बैठक झाली. बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'पुण्यात तयार होणार भारत बायोटेकची लस'
'भारत बायोटेकने आपल्या जिल्ह्यात लस निर्मिती करण्यासाठी 20 एकर जमीन मागितली होती. आपण ती तत्काळ दिली. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी तिथे भेट दिली. तिथे लाईट, पाणी वगैरे सुविधा तत्काळ दिल्या जात आहेत. ही लस नियमानुसार सर्वत्र पुरवली जाईल. पण पुण्यालाही ही लस मिळावी यासाठी मी अधिकाऱ्यांना प्रयत्न करायला सांगितले आहेत', असे अजित पवार म्हणाले.
'संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू'
'कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता गृहीत धरून राज्य शासन व प्रशासनाच्या वतीने आरोग्य सुविधा आणखी सक्षम करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स समिती स्थापन करण्यात येत आहे. याद्वारे लहान मुलांवरील उपचाराबाबत मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक औषधे, आवश्यक साधनसामग्री व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत तयारी करण्यात येत आहे. ससून, यशवंतराव चव्हाण, नायडू रुग्णालयांसह जिल्ह्यातील भारती, सिम्बायोसिस, रुबी, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अशा खासगी रुग्णालयांनीदेखील लहान मुलांसाठी स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्याबाबत कार्यवाही करावी', असे अजित पवारांनी म्हटले आहे.