बारामती - 'मला छत्रपती साखर कारखान्यावर डायरेक्टर केले.. तेव्हा माझे लग्न सुद्धा झाले नव्हते... लग्नावेळी मुलीकडचे लोक विचारत असतात की पोरगा काय करतो... तेव्हा आमच्या घरचे म्हणाले आमचा पोरगा कारखान्याचा डायरेक्टर आहे... मंग आमच्या लग्नाला जरा सोपं गेलं...अन् पद्मसिंह पाटील म्हणाले द्या त्याला आपली बहीण... कधी तरी चांगलं होईल.... असा लग्न जमण्यापूर्वीचा किस्सा खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितला. यावेळी उपस्थितांमध्ये मोठा हाश्या पिकला. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गव्हाण पूजन व गाळप हंगामाचा शुभारंभ आज (शुक्रवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते.
महाविकास आघाडी जमिनीवर पाय ठेवून काम करते -
सरकार येत असत जात असत. सरकार नसलं तरी चिकाटी सोडायची नाही आणि सरकार आलं तर जमिनीवर पाय ठेऊन चालायचं हीच भूमिका महाविकास आघाडीची असून त्यानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले की, शेतकऱ्यांना केंद्राकडून मर्यादित रक्कम मिळते ती तुटपुंजी ठरते, सरकार कोणाचं ही असलं तरी शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान झाले तेवढी मदत कोणतेच सरकार देऊ शकत नाही, अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली.