बारामती - तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून आतापासूनच काटेकोर नियोजन करा, ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन बारामतीत ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा, रेमडेसिवीर इंजेक्शनचे योग्य प्रकारे नियोजन करा तसेच बारामती तालुक्यातील सुपे येथे कोविड सेंटर उभारण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीची आढावा बैठक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. अजित पवार यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांची माहिती वरिष्ठ वैद्यकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. तालुक्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचे नियोजन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.