महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला बारामतीतील कोरोना उपाययोजनांचा आढावा

बारामती शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी उद्यापासून निर्बंधामध्ये वाढ करण्यात आली आहे. यामध्ये आता शनिवारी आणि रविवारी वैद्यकीय सेवा वगळता सर्व आस्थापना दुकाने बंद राहतील, असा निर्णय आज स्थानिक प्रशासनाने घेतला.

उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार

By

Published : Jul 17, 2021, 3:46 PM IST

बारामती - बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी काटेकोरपणे उपाययोजना राबवा, कोणत्याही परिस्थितीत पॉझिटिव्हीटी रेट कमी होणे आवश्यक आहे. तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने सतर्क राहुन योग्य नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोरोना विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

बारामतीतील कोरोना उपाययोजनांचा आढावा

बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना, म्यूकरमायकोसिस संसर्गाची सद्यस्थिती, प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण, ऑक्सिजन उपलब्धता, आरोग्य सुविधा, पॉझिटिव्हीटी रेट आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लावणे आवश्यक आहे. कसल्याही परिस्थितीत पॉझिटिव्हीटी रेट कमी होणे गरजेचे आहे. कोरोना बाधितांशी संपर्क वाढला की रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वार्ड निहाय सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करणे, त्यांचे विलगिकरण होणे आवश्यक आहे. प्रशासनास पूर्ण अधिकार दिले आहेत,स्थानिक पातळीवर प्रशासनाने त्याचा वापर करावा. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शहरात तसेच ग्रामीण भागात सोयी सुविधा उपलब्ध करुन ठेवणे आवश्यक आहे.

म्यूकरमायकोसिस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या -

म्यूकरमायकोसिस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता सर्व सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, सर्व रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित करणे, कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी मास्क वापरावा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याबाबतची दक्षता घ्यावी, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

शनिवार आणि रविवारी बारामती राहणार बंद -

बारामती शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी उद्यापासून निर्बंधामध्ये वाढ करण्यात आली आहे. यामध्ये आता शनिवारी आणि रविवारी वैद्यकीय सेवा वगळता सर्व आस्थापना दुकाने बंद राहतील, असा निर्णय आज स्थानिक प्रशासनाने घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details