दौंड - श्री भानोबा देवाचा कुसेगाव येथील यात्रोत्सवाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर दौंड तालुक्यातील कुसेगाव येथून आज श्री भानोबा देवाचे कोयाळीकडे प्रस्थान झाले. फुलांनी सजवलेल्या बसमधून 'भानोबाचं चांगभलं'चा जयघोष करीत कुसेगावातून श्री भानोबा देव जाताना कुसेगावचे ग्रामस्थ आणि भाविकांनी मार्गावर पुष्पवृष्टी केली. तरुणांनी ढोल-ताशे वाजवत गुलाल उधळून 'भानोबाचं चांगभलं'चा जयघोष केला. यावेळी मोठी गर्दी कुसेगाव येथे झाली होती. भानोबा देव कोयाळीकडे जाताना भाविक भावनिक झाले.
यात्रोत्सव संपल्यानंतर भानोबा देवास कोयाळी येथील मंदिरात नेले जाते
श्री भानोबा देवाची यात्रा ही वैशिष्ट्यपूर्ण यात्रा असते. या यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक हजेरी लावत असतात. मात्र यंदा कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर कुसेगाव येथील भानोबा देवाची यात्रा शासनाच्या निर्णयामुळे रद्द करण्यात आली. यात्रेसाठी कुसेगावचे लोक भानोबा देवास कोयाळी (ता. खेड) येथून कुसेगावला घेऊन येत असतात. कुसेगाव येथे यात्रोत्सवासाठी देव आणला जातो. दिनांक ३१ आणि १ असे दोन दिवस यात्रोत्सवाचा कालावधी संपल्यानंतर भानोबा देव त्यांच्या मूळ कोयाळी येथील मंदिरात नेण्यासाठी कोयाळीचे लोक आले होते.