पुणे -गेल्या वर्षाच्या तुलनेत सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये मध्ये शहरात डेंग्यू, टायफॉईड, चिकुनगुनिया, कावीळच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून अली. ही वाढ रुग्णांमध्ये सरासरी 7 ते 10 टक्क्यांची होती. मात्र, पावसाने दिलेली उघडीप आणि नागरिकांमध्ये करण्यात आलेली जनजागृती यामुळे गेल्या ऑक्टोबर महिन्यात शहरात डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण सप्टेंबरच्या तुलनेत घटले आहेत. ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचे रुग्ण १३ टक्क्यांनी, तर चिकुनगुनियाचे ४७ टक्क्यांनी घटले आहे.
पावसाळी वातावरणामुळे साथीच्या रोगांचा फैलाव -
शहर परिसरात सततच्या पावसाळी वातावरणामुळे साथीच्या रोगांचा फैलाव पाहायला मिळाला. तसेच गेल्यावर्षी लॉकडाऊनकाळात लोकांचे बाहेरचं खाणे बंद झाले होते. त्यात गेल्यावर्षी पावसाळ्यातही अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना लॉकडाऊन काळात फारशी सूट नव्हती. त्यामुळे लोकांचा घराबाहेरचा वावर कमी होता. या कारणाने विषाणूजन्य आजारांचे प्रमाण दरवर्षीपेक्षा गेल्यावर्षी कमी झालं होते. मात्र, आता अनलॉक झाल्याने लोकांनी रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि जंकफूड खायला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. याचा परिणाम आता आरोग्यावर होऊ लागला आहे. परिणामी आजारांचं प्रमाण वाढत आहे.