बारामती (पुणे) - हंगामपूर्व छाटणी केलेल्या द्राक्षाला यावर्षी उच्चांकी दर मिळाला आहे. इंदापूर तालुक्यातील बोरी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी संतोष भानुदास धायगुडे यांच्या शेतीतील ही द्राक्षे आहेत. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोरी, काझड, बिरगुंडी, लासुर्णे परिसरात मोठ्या प्रमाणात द्राक्षबाग आहेत. बोरी गावात अडीच हजार एकरापेक्षा जास्त बागा आहेत. येथील संतोष धायगुडे यांच्याकडे २० एकरावर द्राक्ष बाग आहे. धायगुडे यांनी ३१ ऑगस्ट रोजी हंगामपूर्व छाटणी केलेल्या द्राक्ष बागेतील द्राक्ष साडेतीन ते चार महिन्यात परिपक्व झाली.
शरद बिया विरहीत द्राक्षाच्या काळ्या वाणाचे एकरी उच्चांकी १२ टन उत्पादन मिळाले आहे. या द्राक्ष बागेतील मण्यांचा आकार मोठा असून, घडाचे वजन ८०० ते ९०० ग्रॅम असल्याने बागेतील ९० टक्के द्राक्षे डीजे निर्यात कंपनीच्या वतीने श्रीलंकेतील कोलंबो येथे पाठविण्यात येणार आहेत. निर्यातक्षम द्राक्षामुळे धायगुडे यांना भरघोस उत्पन्न मिळणार आहे.