पुणे- इमारतीची संरक्षक भिंत कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात भिंतीच्या मलब्याखाली दबून १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. ही घटना कोंढव्यातील सोमाजी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडली. या ठिकाणी अजुनही बचावकार्य सुरू आहे. या घटनास्थळाला पुणे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांसह स्थानिक आमदार योगेश टिळेकर, महापौर मुक्ता टिळक यांनी भेट दिली आहे.
कोंढवा भिंत दुर्घटना; दोंषीवर कठोर कारवाई करण्याची सर्वस्थरातून मागणी घटनेची चोकशी करून दोषींवर कारवाई करा - अशोक चव्हाण
पुण्याच्या कोंढवा परिसरात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खद आहे. मृतांच्या व जखमींच्या कुटुंबीयांना सरकारने मदत करावी व या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
दोषींवर कारवाई करणार - आमदार योगेश टिळेकर
ही घटना अत्यंत दुर्देवी असून यातील दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात महापौर, पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त व राज्य सरकारसोबत बोलणे झाले आहे. चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बांधकाम थांबवण्याचे आदेश - महापौर मुक्ता टिळक
या ठिकामी सूरू असलेले बांधकाम थांबवण्याचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी दिले आहेत.
चौकशी करून योग्य ती करावाई करणार - पोलीस आयुक्त
आमची टीम यासंदर्भात चौकशी करत आहे. बांधकामासाठी परवानगी घेण्यापासून ते सेफ्टीसाठी केलेल्या उपाययोजनांची सखोल चौकशी करून दोषींवर लवकर कारवाई केली जाईल.
दुर्घटनेप्रकरणी दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई झाली पाहिजे - सुप्रिया सुळे
कोंढवा दुर्घटनेने बांधकाम मजूरांच्या सुरक्षेचा मुद्दा किती गंभीर आहे हे समोर आले. बांधकामावर राबणाऱ्या जीवांचे काहीच मोल नाही का? हे कामगार असंघटित क्षेत्रातील आहेत म्हणून त्यांच्या सुरक्षेकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे का?पुणे पालिकेनेदेखील ही घटना गांभिर्याने घ्यावी.
नगरविकास खात्यानेही बांधकाम व्यावसायिक कामगार पुरविणारे ठेकेदार यांच्यावर असणारी कामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षितता पुरविण्याची जबाबदारी निश्चित करावी.त्याची कठोर अंमलबजावणी होतेय की नाही हे सरकारने पहावे व कोंढवा दुर्घटनेप्रकरणी दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.