पुणे Delivery Boy Strike : तुम्ही जर पुणे किंवा पिंपरी-चिंचवड शहराचे रहिवासी असाल आणि तुम्हाला विविध अॅप्सद्वारे ऑनलाईन ऑर्डर करायची सवय असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आज तुम्हाला तुमची ऑर्डर मिळेलच, याची खात्री नाही. आज (२५ ऑक्टोबर) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ओला, उबर, स्विगी, झोमॅटो, पोर्टर आणि अर्बन कंपनीचे डिलिव्हरी बॉय व ड्रायव्हर संपावर गेले आहेत.
डिलिव्हरी बॉय आणि ड्रायव्हर्सच्याकाय समस्या आहेत : इंडियन गिग वर्कर्स फ्रंटनं हा संप पुकारला आहे. डिलिव्हरी बॉय आणि ड्रायवर्सला कामगारांचा दर्जा देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी हा संप पुकारण्यात आलाय. आता यावर सरकार काही निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. संप करणाऱ्या डिलिव्हरी बॉय आणि ड्रायव्हर्सच्या नेमक्या काय समस्या आहेत ते जाणून घ्या.
- ड्रायव्हरला किंवा डिलिव्हरी बॉयला कुठल्याही प्रकारचा ऑनलाइन किंवा ऑफलाईन सपोर्ट नसणे.
- ग्राहकानं केलेल्या तक्रारीची शहानिशा न करता परस्पर आयडी ब्लॉक करणं किंवा मोठा दंड आकारणं.
- ब्लॉक केलेला आयडी चालू करण्यासाठी दलालांमार्फत मोठी रक्कम उकळणं.
- ऑर्डर किंवा राईडच्या वेळी प्रत्यक्षात जास्त अंतर असताना, मोबाईलवर कमी अंतर दाखवणं.
- कमी मोबदला देऊन फसवणूक करणं. याबाबत दाद मागण्यासाठी कुठलीही यंत्रणा नसणं.
- कंपन्यांच्या एकमेकांशी वाढत्या स्पर्धेमुळे ८-९ रुपये प्रति किलोमीटर दरावर कॅब चालकांना काम करण्यास भाग पाडणं.
- टुरिस्ट बुकिंगसाठी बेकायदेशीर पांढऱ्या नंबर प्लेटच्या गाड्या वापरून शासनाची, इन्शुरन्स कंपन्यांची तसेच प्रवाशांची फसवणूक करणं. यामुळे कायदेशीर व्यवसाय करत असलेल्या पिवळ्या नंबरप्लेटच्या वाहन चालकांच्या व्यवसायावर परिणाम होतो.