पुणे - तेलंगणा राज्याचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी बारामतीतील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. त्यांच्यासोबत तेलंगणाचे कृषी सचिव बी. जनार्दन रेड्डी, कृषी संचालक एल. वेंकटराम रेड्डी, सहसंचालक व्ही. सरोजिनी देवी, उपसंचालक एम.व्ही. मधुसूदन, अपेडाचे उपमहासंचालक नागपाल लोहकरे, संशोधन संचालक डॉ. ए. भगवान, उपसंचालक के. वेणुगोपाल होते. कृषी विज्ञान केंद्रातील तंत्रज्ञानाच्या प्रसाराचे काम पाहून हे शिष्टमंडळ प्रभावित झाले.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी या शिष्टमंडळाचे स्वागतकरून त्यांना कृषीतंत्रज्ञान प्रसाराच्या कामाची माहिती दिली. तेलंगणाचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी पुणे जिल्ह्यातील भौगोलिक माहिती, येथील मृदा व पाण्याची स्थिती जाणून घेतली. कृषी विज्ञान केंद्रातील जिवाणू प्रयोगशाळा, माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेची पाहणी केली. भाजीपाला उच्च गुणवत्ता केंद्रालाही त्यांनी भेट दिली. मधुमाशीपालन व शेती उत्पादन वाढण्यासाठी त्याच्या उपयोगाबाबत त्यांनी तज्ञांकडून अधिक माहिती घेतली.