महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाढत्या शहरीकरणामुळे पवित्र भीमा नदीचा ऱ्हास - भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख

शहरीकरण वेगाणे वाढत आहे. मात्र या शहरीकरणाचा फटका निर्सगाला बसत आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून भीमाशंकर येथे उगम पावणारी पवित्र भीमानदीचा शहरीकरणामुळे ऱ्हास होत आहे.

भीमानदी
भीमानदी

By

Published : Dec 4, 2020, 4:48 PM IST

पुणे (राजगुरुनगर)- सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून भीमाशंकर येथे उगम पावणारी पवित्र भीमा नदी डोंगर कपारीतून नागमोडी वळणे घेत शहरी भागातून वाहत आहे. याच पवित्र भीमा नदीला वाढत्या शहरीकरणामुळे गटार गंगेचे स्वरूप आले आहे. शहरी भागातील सांडपाणी, दूषित पाणी थेट भीमानदीच्या पात्रात सोडले जाते. त्यामुळे भीमा नदीला गटारगंगेचे रूप येऊन नदीपात्रात जलपर्णी वाढू लागली आहे. मात्र भीमेचा असा ऱ्हास होत असताना नागरिकांसह प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

भीमानदी

भीमा नदीवरील चासकमान जलाशयानंतर खळखळ पाण्याने वाहणारी भीमा नदी आता दुर्गंधीयुक्त पाण्याने वाहत आहे. नदी पात्रालगत असणाऱ्या राजगुरूनगर शहराचा झपाट्याने विकास होत आहे. मात्र हा विकास होत असताना शहरातील दुर्गंधीयुक्त पाणी, सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे भीमा नदीचे रूप बदलून गेले आहे. दुर्गंधीयुक्त पाण्याने वाहणाऱ्या भीमा नदीत जलपर्णी वाढत आहे. त्यामुळे पवित्र भीमा नदीचा होणारा ऱ्हास हा मानव निर्मित असल्याचे स्पष्ट होते.

साथीच्या आजारांची भीती-

कोरोना महामारीच्या संकटानंतर साथीचे आजार रोखण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध उपाय योजना राबवल्या जात आहेत. मात्र राजगुरुनगर शहरासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरालगत वाहणारी भीमानदी ही दुर्गंधीयुक्त झाली. यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे नदीपात्रात असणारे जलचर प्राणीही मृत्युमुखी पडत आहे.

भिमेचा श्वास कोंडला-

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भीमाशंकर येथे उगम पावणारी भीमानदी ही शिवशंकराची आवडती नदी म्हणून मानली जाते. या भीमेचा उगम स्थान असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. भीमानदी भीमाशंकर येथे उगम पावल्यानंतर हिरवाईने नटलेल्या डोंगर कपारीतून धबधब्यांच्या रूपातून मोठ्या नदीपात्रात रुपांतर करते. तेव्हा ती थेट शहरी भागातल्या प्रदूषणाच्या जबड्यात उतरते. मागील काही वर्षांपासून नदीपात्रात होत असलेल्या प्रदूषणामुळे खळखळून वाहणाऱ्या भीमाचे रूप बदलून गेले आहे. विस्तीर्ण भिमाच्या पात्रावर नजर जाईल तिथपर्यंत जलपर्णीचे साम्राज्य दिसत आहे आणि या जलपर्णीखाली भिमेचा श्वास कोंडत आहे.

पाणी पिण्यास अपायकारक-

भीमानदीच्या पाण्यावर राजगुरुनगर शहरासह शिरोली होलेवाडी, खरपुडी खुर्द, खरपुडी बुद्रुक, निमगाव दावडी व अनेक गावे, वाड्या-वस्त्या पिण्याच्या पाण्यासाठी भीमा नदीवर अवलंबून आहेत. याच नदीवर असणाऱ्या कोल्हापूर बंधाऱ्यातून अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या गावांना दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पिण्याच्या पाण्याची योजना कधी-

चासकमान जलाशयातून राजगुरुनगर शहरासाठी स्वच्छ पाणी मिळावे. यासाठी भाजपाच्या माध्यमातून नव्याने पाणी योजना मंजूर करण्यात आली. या पाणी योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र लॉकडाऊनमुळे पाणी योजनेच्या कामाला अडथळे आल्याने ही पाणी योजना अद्यापही सुरू होऊ शकले नाही. मात्र पुढील काळात ही योजना लवकरच पूर्ण होऊन राजगुरुनगर शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करणार आहे. व शहरी भागातील सांडपाणी हे गटार योजनेच्या माध्यमातून प्रक्रिया करून नदीपात्रात सोडले जाईल. त्यामुळे पुढील काळात भीमा नदीचे रूप बदलणार असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा-भाजप आत्मचिंतन करणार - सुधीर मुनगंटीवार

हेही वाचा-बनावट मद्य प्रकरण: 'लिकर किंग' पाठोपाठ राधाकृष्ण विखेंच्या अडचणी वाढणार?

ABOUT THE AUTHOR

...view details