महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना नियंत्रणासाठी प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावीपणे उपाययोजना राबवा- डॉ.दीपक म्हैसेकर

पिंपरी- चिंचवडमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात कडक निर्बंध राबवावेत.नागरिकांना मास्क व सॅनिटायझर पुरवावे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच करावा, जेणेकरुन येथील नागरिक घराबाहेर पडणार नाहीत,अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केल्या.

deepak mhaisekar taking review in containment zone
डॉ. दीपक म्हैसेकर प्रतिबंधित क्षेत्राचा आढावा घेताना

By

Published : May 14, 2020, 9:34 AM IST

पुणे- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील इंदिरानगर वसाहत (‍चिंचवड स्टेशन ) व रुपीनगर (तळवडे), भोसरी या प्रतिबंधित क्षेत्राला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भेट देवून पाहणी केली. कोरोना नियंत्रणासाठी प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावीपणे उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना यावेळी डॉ. म्हैसेकर यांनी केल्या.

प्रतिबंधित क्षेत्राच्या पाहणी दरम्यान महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनील रॉय, डॉ. पी.एच.ताडे, डॉ.रामनाथ बच्छाव, क्षेत्रीय अधिकारी आशादेवी, सहायक आरोग्य अधिकारी एम.एम.शिंदे तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते. पिंपरी- चिंचवडमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात कडक निर्बंध राबवावेत. तसेच प्रशासनाच्यावतीने सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करुन रुग्ण वाढू नयेत, यासाठी दक्षता घ्यावी, अशा सूचनाही मैसेकर यांनी महापालिका व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या तपासणीवर भर द्यावा, असे डॉ. म्हैसेकर म्हणाले. प्रतिबंधित क्षेत्रातील कोविड 19 सदृश्य लक्षणे आढळणा-या नागरिकांच्या तपासणीसाठी या परिसरानजीक कोविड फ्लू सेंटर सुरु करावे. याबरोबरच घरोघरी जाऊन नागरिकांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण करावे. सर्वेक्षण करताना ज्येष्ठ नागरिक व उच्च रक्तदाब, श्वसनाशी ‍संबंधीत आजार असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत विशेष दक्षता घ्यावी. या व्यक्तींच्या तपासणीसाठी शिबीर घ्यावे, असे सांगून प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना मुलभूत सोयी- सुविधा पुरविण्यासाठी नियोजन करावे, सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या साफ-सफाईवर भर द्यावा. नागरिकांना मास्क व सॅनिटायझर पुरवावे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच करावा, जेणेकरुन येथील नागरिक घराबाहेर पडणार नाहीत. गृहभेटीव्दारे केलेल्या वैद्यकीय तपासणीच्या नोंदी वेळोवळी घेण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्रात उपाययोजना राबवण्यासाठी आवश्यकतेनुसार प्रशासनाच्यावतीने मदत करण्यात येईल, असे डॉ.दीपक म्हैसेकर म्हणाले. प्रतिबंधित परिसरातील नागरिकांना निश्चित केलेल्या कालावधीत अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कोणालाही ये-जा करता येणार नाही, याची दक्षता घ्यावी. येथील रहिवाशांना भाजीपाला, दूध अशा जीवनावश्यक वस्तू त्याच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी, असेही ते म्हणाले. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रतिबंधित क्षेत्रात करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details