महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुंठेवारीचा निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला नाही - अजित पवार

गुंठेवारीचा निर्णय निवडणुका डोळ्या समोर ठेऊन घेतलेला नाही. तसेच कोणतेही निर्णय घेतले म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच घेतले, असे होत नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

decision-of-land-commercialization-has-nothing-to-do-with-election-said-ajit-pawar
गुंठेवारीचा निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला नाही - अजित पवार

By

Published : Jan 8, 2021, 4:54 PM IST

पुणे - राज्यात गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकार ने घेतला आहे. हा निर्णय निवडणुका डोळ्या समोर ठेऊन घेतलेला नाही. त्यामुळे गुंठेवारीचा निर्णयावर होत असलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. शुक्रवारी पुण्यातील विधानभवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

प्रमुख तीन पक्ष एकत्रित बसून मार्ग काढतील -

मुळात निवडणुकांना अजून वेळ आहे. कोणतेही निर्णय घेतले म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच घेतले, असे होत नाही. तसेच औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावर बोलताना असे प्रश्न निर्माण होतात तेव्हा महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख तीन पक्ष एकत्रित बसून त्यातून मार्ग काढायचा असतो. त्यामुळे तीन ही पक्षाचे सर्वोच्च नेते योग्य पध्दतीने निर्णय घेतील. त्याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही, असेही अजित पवार म्हणाले.

मेहबूब शेख प्रकरणात तथ्य आढळलेले नाही -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाठीशी घालत आहे, असा आरोप केला जात आहे. या बाबतील पवार यांना विचारले असता, मेहबूब शेख प्रकरणात अद्याप काही तथ्य आढळलेले नाही. तपास चालू असून आम्ही कोणालाही पाठीशी घालत नाही. यात जर कोणी चुकीचे वागले असेल त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा होईल. जर कोणाला कारण नसताना बदनाम करण्याचा प्रयत्न असेल आणि चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला असेल, तर तेही चुकीचे आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी सुरू आहे. त्यातून सर्व माहिती समोर येईल, असे ते म्हणाले.

नियमांचे काटेकोरपणे पालन करावे -

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिकची खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्क व हातांची स्वच्छता तसेच सामूहिक कार्यक्रमांमध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केले. कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात सर्वच यंत्रणांचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही. दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवरही अधिकची खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या आहेत. परदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर लक्ष ठेवा, तसेच नागरिकांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे. शासनाने काही प्रमाणात शिथिलता दिली असली, तरी कोरोना अजूनही गेलेला नाही, त्यामुळे दक्षता घेत नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याला भर गर्दीत झापले -

अजित पवारांच्या तापट स्वभावाचा फटका अधून मधून कुणाला ना कुणाला बसत असतो. कधी भर सभेत, तर कधी कुठल्या कार्यक्रमादरम्यान अजित पवार भडकल्याची उदाहरणे आहेत. शुक्रवारी अजित पवार पुन्हा एकदा भडकले होते आणि यावेळी त्यांच्या या रागाच्या पट्ट्यात खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्तेच आले. राज्य सरकारने गुंठेवारीचा विषय मंजूर केल्याने गावातील कार्यकर्त्यांना घेऊन राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आले होते. अजित पवारांनी कार्यकर्त्यांकडून सत्कार स्विकारावा, अशी विनंती त्यांनी केली. यावरून अजित पवार चांगलेच संतापले. मला सत्काराची आवश्यकता नाही, अशा शब्दात त्यांनी काकडे यांना झापल्याने वातावरण चांगलेच तापले. मात्र, नंतर त्यांनी या कार्यकर्त्यांकडून सत्कार स्विकारला. तसेच येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आता घड्याळ चालावा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

हेही वाचा - जगभरातील देशांशी संबध सुधारण्याची किम-जोंग-उन यांची शपथ

ABOUT THE AUTHOR

...view details