मनसेची राडेबाजी; अधिष्ठात्याच्या केबिनची तोडफोड पुणे : महानगरपालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी मेडिकल रुग्णालयातील अधिष्ठातांनी लाच मागितल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर मनसेने महाविद्यालयातील केबिनची तोडफोड केली. तसेच परिसरातील दोन कम्प्युटर, टेबल, खुर्ची यांची तोडफोड करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात आशिष बनगिनवार आणि त्यांच्यासोबत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसेच्या विद्यार्थी सेनेने केली आहे.
आशिष बनगिनवार यांना अटक :अधिष्ठाता आशिष बनगिनवार यांना 16 लाख रुपयांच्या लाचेतील पहिला हप्ता म्हणून 10 लाख रुपयांची लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या पथकाने काल रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आशिष बनगिनवार यांना अटक करण्यात आली आहे.
मेडिकल प्रवेशासाठी लाचेची मागणी :याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचा मुलगा एनईईटी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एमबीबीएसच्या प्रवेशासाठी पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे इन्स्टिट्युशनल कोटामधून निवड झाली होती. या निवड यादीच्या आधारे तक्रारदार हे आशिष बनगिनवार (डीन) यांना मुलाच्या एमबीबीएसच्या महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेसाठी भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी बनगिनवार यांनी दरवर्षाची शासनमान्य फी 22 लाख 50 हजार रूपये आणि या व्यतिरिक्त प्रवेशासाठी 16 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.
बनगिनवार यांनी स्वीकारली लाच :तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नव्हती. यामुळे त्यांनी याबाबत अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 10 लाख रुपये बनगिनवार यांनी त्यांच्याच कार्यालयात स्वीकारले. दरम्यान अॅन्टी करप्शनच्या पथकाने सरकारी पंचासमक्ष त्यांना रंगेहाथ पकडले आहे. यामुळे आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी आज त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. यापूर्वीही शासकीय अधिकाऱ्यांकडून लाच स्वीकारण्याच्या अनेक घटना पुण्यात घडल्या आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रकरणातील आरोपींविरुद्ध कारवाई देखील केली; पण लाच मागण्याचे सत्र अद्यापही सुरूच आहे. प्रशासनाने याविरुद्ध कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
हेही वाचा:
- शवविच्छेदन अहवालासाठी डॉक्टरने मागितली लाच, दोन जण ताब्यात
- Aurangabad University Bribe Case : पीएचडी लाच प्रकरण; विभाग प्रमुख उज्वला भडांगेचे निलंबन
- दस्त नोंदणीकरता पाच लाखांच्या लाचेची मागणी; दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात