पुणे -अवैध वाळू उपसा करून दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना दौंड पोलिसांनी तडीपार केले आहे. दहशत निर्माण करण्यासाठी आरोपींनी खंडणी मागणे, खून, गंभीर दुखापत, विनयभंग, शिवीगाळ, दमदाटी यांसारखे गुन्हे केले आहेत. तडीपारीच्या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
दोन वाळू माफिया तडीपार :
दौंड तालुक्यातील २ वाळू माफियांना पुणे जिल्ह्यातील दौंड, शिरूर, इंदापूर, बारामतीसह अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांतून ४ महिन्यांकरिता तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीच्या कारवाईचा प्रस्ताव दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी तयार केला होता. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार दोघांना तडीपार करण्यात आले.