दौंड (पुणे) -तालुक्यातील लिंगाळी गावच्या हद्दीत दोन महिन्यापूर्वी केदार उर्फ पिंटू श्रीपाद भागवत यांचा खुनाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. लिफ्ट देण्याचा बहाणा करून लुटमार करण्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींनी हा खून केल्याचे उघडकीस आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कामगिरी केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेले आरोपी
लिफ्ट देण्याचा बहाणा करून लुटमार करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांच्याकडून १ पल्सर मोटरसायकल, २ सोन्याच्या अंगठ्या, ८ मोबाइल व रोख रक्कम असा एकूण २,२६,२७० रुपये किंमतीचा माल हस्तगत केला. यातील चार आरोपींना अटक केली.
१. ओमकार उर्फ काका महेंद्र गावडे( वय २१, रा.बेटवाडी, होलेमळा ता. दौंड, जि. पुणे)
२. राजेश संभाजी बिबे (वय १९, रा. गिरीम ता. दौंड, जि. पुणे मूळ रा. माळेवाडी ता. जि. बीड)
३. अजय ज्ञानेश्वर पवार (वय १९, रा.लोणी काळभोर, एचपी गेटसमोर, ता. हवेली जि. पुणे मूळ रा. गिरीम, ता. दौंड, जि. पुणे)
४. विशाल दिलीप आटोळे (वय २४, रा. गोपाळवाडी, गोकुळनगर ता. दौंड, जि. पुणे)
खबऱ्याने माहिती दिली
दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन महिन्यापूर्वी झालेल्या खुनाच्या उघडकीस न आलेल्या गुन्हयाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्ड वरील आरोपी चेक करून त्यांच्याकडे सदर खुनाच्या गुन्ह्याची अनुषंगाने सखोल चौकशी करीत होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या दौंड भागातील खबऱ्याने हा खून सध्या जबरी चोरीत अटक असलेल्या आरोपींनी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास दिली होती.
आरोपींनी दिली खुनाची कबुली
पथकाने आरोपींकडे अधिक चौकशी केली. यावेळी त्यातील आरोपी नामे राजेश संभाजी बिबे (वय १९, रा. गिरीम, ता. दौंड जि. पुणे, मूळ रा. माळेवाडी ता. जि. बीड), अजय ज्ञानेश्वर पवार (वय १९, रा. लोणी काळभोर, एचपी गेटसमोर, ता. हवेली, जि. पुणे मूळ रा. गिरीम, ता. दौंड, जि. पुणे) या दोघांनी मिळून रेल्वे स्टेशनच्याजवळ दौंडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीस घटनास्थळी नेवून चोरीच्या उद्देशाने त्याची पॅन्ट काढून त्यास दगडाने मारल्याचे सांगितले आहे. त्यावरून सदरचा गुन्हा त्यांनीच केल्याचे निष्पन्न झालेले असून खुनाचा गुन्हा उघडकीस आला आहे.
कामगिरी करणारे पोलीस पथक
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, दौंड उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, दौंड पो. स्टे.चे पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहा. पो. नि. पृथ्वीराज ताटे, पोलीस हवालदार महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, दगडू विरकर यांनी केलेली आहे.