पुणे:दर्शना दत्तू पवार मुळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची होती. तिने स्पर्धा परिक्षेत फॉरेस्ट ऑफिसर (आरएफओ) म्हणून राज्यात तिसऱ्या क्रमांक पटकावला होता. दर्शना ही तीन दिवसांपूर्वी अकादमी तर्फे आयोजित सत्कार समारंभासाठी आली होती. सत्कारानंतर ती ट्रेकींगला गेली अन् परतलीच नाही. १२ जून रोजी दर्शना वारजेतील तिचा मित्र राहुल हांडोरे याच्यासोबत सिंहगड किल्याला ट्रेकींगसाठी जात असल्याचे सांगून गेली होती. पण, सायंकाळनंतर त्यांचे मोबाईल बंद लागले. त्यांच्या कुटूंबाने शोध घेतला. पण ते दोघेही सापडले नाहीत.
दर्शनाच्या कुटूंबियांनी पुण्यातील सिंहगड रोड आणि तिच्या बरोबर असलेल्या तिचा मित्र राहुलच्या कुटूंबियांनी वारजे माळवाडी पोलिसांकडे मिसींगची तक्रार दाखल केली होती. पण, दुर्दैवाने रविवारी तिचा मृतदेह आढळला. तिची ओळख पटवल्यानंतर पोलिसांकडून आता याप्रकरणाचा कसून शोध सुरू केला आहे. पोलिसांकडून राहुलचा शोध सुरू केला आहे. पण तो देखील गायब होता. अखेर त्याला मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.
हत्येचे कारण आले समोर-दर्शना आणि आरोपी राहुल हे एकमेकांचे नातेवाईक असून दोघे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. दोघेही एमपीएससीची परिक्षा देत होते. मात्र यात प्रयत्नांमधे दर्शनाला आधी यश आले. तिने वन विभागाची परिक्षा उत्तीर्ण केली. वन अधिकारी बनण्याची फक्त औपचारिकताच उरली होती. त्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्या मुलासोबत जमवले. तिच्या लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहुल हंडोरे अस्वस्थ होता. एमपीएससीची परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा, अशी त्याने तिच्या कुटुंबियाला विनंती केली. तो देखील परिक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल, असे त्याने दर्शना आणि तिच्या कुटुंबीयांना सांगून पाहिले. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहुलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली.