बारामती(पुणे) - राज्यासह देशात कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीला आता महिना उलटून गेला आहे. तेव्हापासून प्रवाशांची ने-आण करणाऱ्या लालपरीची सेवा पूरती ठप्प असून एसटीची चाके आगारातच रुतून बसली आहेत. महिनाभरापासून बस वाहतुक बंद असल्याने अगोदरच तोट्यात असलेल्या एसटी महामडंळाला कोरोनामुळे फटका बसला आहे.
बारामती आगारातून १०५ बस गाड्यांव्दारे ३६ हजार किलो मीटरचा प्रवास करुन दररोज सुमारे १४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. तसेच उन्हाळी हंगामातून ही आगाराचे अतिरिक्त उत्पन्न वाढत असते. मात्र टाळेबंदीने उन्हाळी हंगाम ही ओसरल्याने महिन्याभरापासून बारामती आगाराचे एकंदरीत तब्बल ९ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.
कोरोनाचा सर्वच क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. लागू असलेल्या टाळेबंदीत छोटे-मोठे उद्योगधंदे व्यापार सध्या पूर्णतः बंद पडले आहेत. शासनाला आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या विविध विभागावर कोरोनाचा परिणाम झाल्याने मोठे उत्पन्न बुडत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दुष्टीने गर्दी टाळण्यासाठी टाळेबंदी हाच एकमेव पर्याय असल्याने सर्वच प्रवासी वाहतुक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे महिन्याभरापासून लालपरीची चाके आगारातून हलली नाहीत.
बारामती आगराला ९ कोटींचा फटका-