पुणे- कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. यामुळे गरिबांच्या हातचा रोजगार गेला आहे. अशा लोकांना मदतीचा हात देण्याकरिता विविध संघटनाही पुढे येत आहेत. पुण्यातील दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अर्थात डिक्कीच्यावतीने गरजू लोकांना दोन वेळचे अन्न आणि गरिबांना रेशन किट दिले जात असून गेल्या ४७ दिवसांपासून हे काम सतत सुरू आहे.
माहिती देताना दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे अन्न वाटप कार्यात डिक्कीचे सभासद आणि त्याचे कुटुंबीयही सहभाग घेत आहे. दररोज हजारो अन्नाची पाकीटे तयार करून गरजूं पर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. ज्याचे हातावर पोट आहे अशा रिक्षावाल्यांनाही डिक्कीतर्फे रेशन वाटप सुरू केले असून, जोपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे, तो पर्यत डिक्कीचे अन्नवाटपाचे कार्य सुरू राहणार असल्याचे डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी सांगितले.
..अशा प्रकारे मदतीला झाली सुरूवात
लॉकडाऊन जाहीर होताच अडचणीत असलेल्या लोकांना मदतीसाठी काय करता येईल, याबाबतची चर्चा डिक्कीच्या संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांशी केली. त्यानंतर अशा लोकांसाठी किचन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामासाठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचे संचालक भारत आहुजा यांच्या माध्यमातून कॉलेजचे संपूर्ण कॅन्टीन डिक्कीला उपलब्ध करून देण्यात आले. २७ मार्चपासून कॅन्टीनमध्ये 'कम्युनिटी किचन' सुरू करून तिथे जेवण तयार करण्यात येते आहे. या जेवणाची पाकिटे कार्यकर्त्यांमार्फत रोज दोन्ही वेळ गरजूंपर्यंत पोहोचविल्या जात आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून डिक्कीचे सर्व पदाधिकारी काम करत आहेत.
तसेच, गरजूंबरोबरच सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना देखील जेवण पुरविण्याची विनंती डिक्कीतर्फे जिल्हा प्रशासनाला करण्यात आली होती. त्यानुसार काही रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांना जेवण उपलब्ध करून दिले जात आहे.
हेही वाचा-कोरोना नियंत्रणासाठी प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावीपणे उपाययोजना राबवा- डॉ.दीपक म्हैसेकर