पुणे : Dahi Handi 2023: महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव (Dahi Handi) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दहीहंडीला खेळाचा दर्जा दिल्यानंतर गोविंदा पथकात उत्साह पाहायला मिळत आहे. दहीहंडी उत्सवात राज्यभर ठिकठिकाणी गोविंदा पथकं उंचच्या उंच मानवी मनोरे रचून दहीहंडीला सलामी देतात. यात मोठ्या संख्येनं विजेत्यांना पारितोषिक देखील दिले जातात. गेल्या काही वर्षात पुरुषांच्या गोविंदा पथकांनंतर महिलांचं पथक देखील दहीहंडीसाठी तयार झाल्याचं पाहायास मिळत आहे. असं असलं तरी 'पुणे तिथं काय उणे' हे नेहमीच म्हटलं जाते. याची प्रचितीही नेहेमी आपल्याला पुण्यात पाहायला मिळते. पुण्यात आता तर राज्यातील पहिलं तृतीयपंथीयांचं गोविंदा पथक तयार झालं असून, या पथकाकडून जोरदार सराव सुरू आहे. (Dahi Handi In Pune)
तृतीयपंथीयांचं गोविंदा पथक तयार: मुंबई ठाण्यासह आता पुण्यातही मोठ्या जल्लोषांमध्ये दहीहंडी उत्सव साजरा होत असतो.अनेक आकर्षक बक्षीस हिंदी, मराठी, अभिनेते अभिनेत्री हे दहीहंडी उत्सवात प्रमुख आकर्षण असतात. विविध गोविंदा पथकं हे मनोरे रचून दहीहंडीला सलामी देतात. आता पुरुषांप्रमाणे ही महिलांची दहीहंडी तितक्याच जोरात होते. पण आता महाराष्ट्रातील पहिलं असं तृतीयपंथीयांचं गोविंदा पथक तयार होत आहे. ज्यात जवळपास 50 हून अधिक तृतीयपंथी यामध्ये सहभागी होत आहेत. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड मिळून या तृतीयपंथीयांनी चार गोविंदा पथक तयार करुन ते यंदा दहीहंडी उत्सव साजरा करणार आहेत.
महाराष्ट्रातील पहिलं तृतीयपंथी गोविंदा पथक :सर्वसामान्य नागरिकांप्रमाणं तृतीयपंथीयांना देखील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रयत्न शासनाकडून केले जात आहेत. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर्फे तृतीयपंथीयांना सुरक्षा रक्षकाची नोकरी देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं आहे. आता यातील काही तृतीयपंथी आणि मंगलमूर्ती किन्नर चॅरिटेबल ट्रस्टमधील तृतीयपंथी यांनी मिळून पुण्यामध्ये पहिल्यांदाचं महाराष्ट्रातील पहिलं तृतीयपंथी गोविंदा पथक तयार केलं आहे.
एकूण 4 पथकं तयार :सामाजिक कार्यकर्त्या शर्वरी गवंडे यांनी सांगितलं की, त्या गेली कित्येक वर्ष तृतीयपंथीयांसाठी काम करत आहे. त्यांच्या मनात विचार आला की, तृतीपंथीयांचं पथक तयार करावं. मंगलमूर्ती किन्नर चॅरिटेबल ट्रस्टशी बोलून तशी तयारी सुरू केली. सुरुवातीला या लोकांना त्रास झाला, पण आज पुणे आणि पिंपरी चिंचवडचे मिळून एकूण 4 पथक तयार झालं असल्याचं यावेळी शर्वरी गवंडे यांनी सांगितलं.