पुणे -जिल्ह्यातील मावळ परिसरात असणारे हजारो तरुण मुंबईमधील चाकरमान्यांना जेवणाचे डबे पुरवण्याचे काम करत होते. पण, कोरोनामुळे या मुंबईतील डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ आली असून मावळातील काही तरुण मूळ गावी येऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी हे तरुण कंपनीत काम करत आहेत. कडक टोपी आणि पांढराशुभ्र पोशाख घालणारे डबेवाले कंपनीत राबत असून कुटुंबाच्या पोटाचा प्रश्न सोडवत आहेत. दरम्यान, मावळ परिसरातून हजारो परप्रांतीय मजूर त्यांच्या मूळ गावी गेल्याने कंपनीत मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो भरुन काढण्याचा प्रयत्न सध्या मुंबईचे डबेवाले करत आहेत, असे म्हणावे लागेल.
कोरोनामुळे सुरू झालेल्या टाळेबंदीमुळे अनेक उद्योग बंद झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे आपले मुळ गाव सोडून इतरत्र गेलेले लहान व्यवसायिक व रोजंदार कामगार यांच्या खाण्यापिण्याचीही भ्रांत झाली होती. त्यामुळे अनेक जण आपापल्या गावी परतून मिळेल ते काम करत आपल्या संसाराचा गाडा ओढत आहेत.
पुण्याच्या मावळ तालुक्यातील दत्ताराम पांगारे हे गेल्या 16 वर्षापासून मुंबईमध्ये डबेवाला म्हणून आपला व्यवसाय करत होते. परंतु, कोरोनामुळे त्यांचा डब्यांचा व्यवसाय ठप्प झाल्याने इतर साथीदारासह ते तळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीत काम करत आहेत. मुंबईमध्ये डबे देण्याचे काम गेल्या तीन महिण्यांपासून बंद आहे. त्यामुळे कुटुंबाच्या पोटाचा प्रश्न ऐरणीवर आला आणि गावची वाट धरली.