पुणे - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन लावला. त्यामुळे सर्व व्यवहार व व्यवसाय ठप्प झाले. याचा अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला. मुंबईतील नोकरदार व विद्यार्थ्यांची भूक भागवण्याचे काम करणाऱ्या डबेवाल्यांनाही कोरोनाचा फटका बसला. लॉकडाऊन काळात मुंबईत काम करणारे अनेक डबेवाले आपापल्या गावी परतले आहेत. पुण्याच्या जुन्नर, आंबेगाव, खेड, वडगाव, मावळ परिसरातील अनेक डबेवाले मुंबईतून गावी परत आले आहेत. मात्र, गावी येऊनही त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटला नाही.
गावाला आलेला 'डबेवाला' करतोय संकटांचा सामना मुंबईसारख्या महानगरामध्ये 130 वर्षांपासून अल्पदरात जेवणाचे डबे पोहोचवणारा डबेवाला गावाला आल्यानंतर कामाच्या शोधात भटकंती करताना दिसत आहे. काहींच्या हाताला काम मिळत नाही, तर काहींना गावकी-भावकीच्या वादात हक्काच्या शेतातही काम करता येईना. दुहेरी संकटात सापडलेल्या डबेवाल्यांची आपल्या जन्म गावात हेळसांड होत आहे, ही दुर्दैवी बाब आहे.
खेड, आंबेगाव, जुन्नर, वडगाव आणि मावळ या तालुक्यातून मुंबईमध्ये 3 तीन हजार 500 पेक्षा जास्त डबेवाले सेवा देतात. मात्र, कोरोना महामारीच्या संकटात हा डबेवाला मुंबई सोडून आपल्या जन्मगावी आला. गावाला शेती असूनही गावकी-भावकीच्या वादात शेतातही काम करता येत नाही. कपाळी टीळा, खडक टोपी आणि पांढरा शुभ्र पोशाख घालून डबेवाला रोज सकाळी कामाच्या शोधात बाहेर पडतो. मात्र, दिवसभर भटकंती करूनही हाताला काम मिळत नाही. काहीजण शेतात मजुरी, बिगारी व कंपनीत कामगार म्हणून काम मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. हाताला काम मिळत नाही. त्यामुळे आपल्या संसाराचा गाडा कसा चालवायचा? असा गंभीर प्रश्न डबेवाल्यांसमोर उभा राहिला आहे. अनेकांना मुलांच्या शिक्षणाचीही चिंता सतावत आहे.
मुंबईमध्ये डबेवाल्यांची मोठी संघटना आहे. राज्यात जेव्हा-जेव्हा मोठी आपत्ती आली तेव्हा या संघटनेने जनतेला मदत केली. मात्र, सध्या हाच डबेवाला संकटात असताना डबेवाल्यांना पुरेशी मदत मिळेनाशी झाली आहे. त्यांचे रेशन कार्ड मुंबईचे असल्याने गावाला त्यांना रेशन मिळत नाही. अशा अनेक संकटांचा सामना करणाऱ्या डबेवाल्यांच्या मागे सरकारने खंबीरपणे उभे राहून त्यांना मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा या डबेवाल्यांना आहे.