पुणे : देशात एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विरोधकांची एकजूट करण्याच्या कामी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रयत्न करत आहेत. तसंच उद्या विरोधकांच्या 'इंडिया'ची बैठक ही देखील मुंबईत पार पडणार आहे असं असताना लहानपणापासूनचे शरद पवार यांचे मित्र राहिलेले आणि सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी शरद पवार यांच्या बाबतीत एक मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, शरद पवार यांचं आता वय झालं आहे आणि आता त्यांनी निवृत्त व्हायला पाहिजे आणि आराम केला पाहिजे, असा सल्ला यावेळी पूनावाला यांनी शरद पवार यांना दिला आहे. (Cyrus Poonawalla On Sharad Pawar)
पुण्यात विश्वसुंदरीच्या संदर्भात एका चर्चासत्राच्या कार्यक्रमात पद्मश्री सायरस पूनावाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांना पवार यांच्या बाबतीत विचारलं असता त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, शरद पवार यांना दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी होती. ती संधी त्यांनी घालवली. शरद पवार (Sharad Pawar) हे खूप हुशार आहेत आणि त्यांनी जनतेची खूप सेवा केली असती. ती जी पंतप्रधान पदाची संधी होती ती संधी गेली. आता तर त्यांचं वय देखील झालं आहे. म्हणून त्यांनी निवृत्ती घ्यावी आणि आराम करावा असा सल्ला देखील त्यांचे जिवलग मित्र सायरस पूनावाला यांनी यावेळी दिला.