पुणे- २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून ज्योतिष महिलेची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 31 वर्षीय ज्योतिष महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे इतरांचे भविष्य सांगणाऱ्या महिलेला आपल्यापुढे भविष्यात काय वाढून ठेवले हेच समजले नसल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 18 एप्रिल ते 12 मे या दरम्यान घडला. तक्रारदार महिला कोथरुड परिसरात वास्तव्यास असून या परिसरात ती ज्योतिष म्हणून ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी या महिलेला शर्मा नामक व्यक्तीने फोन करत आपण एसबीआयमध्ये मार्केटींग हेड पदावर कार्यरत असून तुम्हाला 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमांतर्गत २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगितले. हे पैसे मिळविण्यासाठी सुरुवातीला टॅक्स स्वरुपात काही पैसे भरावे लागतील, असे सांगितले.
दरम्यान, तक्रारदार महिलेने कधीही कुठलेही लॉटरीचे तिकीट विकत घेतले नव्हते. पण, तरीही लॉटरी लागल्याच्या आमिषाला ती बळी पडली आणि समोरची व्यक्ती सांगेल त्याप्रमाणे विविध बँक खात्यात पैसे भरत राहिली. अशा प्रकारे तिने एप्रिल ते मे या कालावधीत तब्बल 4 लाख 20 हजार रुपये विविध बँक खात्यात भरले. परंतु, तरीही लॉटरीचे पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने अलंकार पोलीस ठाणे गाठत आपली फसवणूक झाल्यासंबंधी तक्रार दिली. पोलिसांनीही या सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तटकरे करीत आहेत.
लॉटरीच्या आमिषाने ज्योतिष महिलेची फसवणूक, ४ लाख २० हजारांचा गंडा - pune crime news
लोकांना भविष्य सांगणाऱ्या एका ज्योतिष महिलेला आपल्या भविष्यात काय होणार? याची कल्पना नव्हती. ती एका सायबर चोरट्याच्या आमिषाला बळी पडली व त्या चोरट्याने तिला तब्बल 4 लाख 20 हजार रुपयांचा गंडा घातला.
प्रातिनिधीक छायाचित्र
Last Updated : Jun 30, 2020, 1:00 PM IST