पुणे - कोरोना संसर्ग आणि त्यानंतर झालेला लॉकडाऊन, सामाजिक स्तरावर एकत्र येण्यास येत असलेल्या मर्यादा, याचा मोठा परिणाम शैक्षणिक संस्थांवर झाला आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे शाळा-महाविद्यालये सुरू होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षण हा पर्याय समोर आला आहे. अनेक शाळा आणि महाविद्यालयात ऑनलाइन शिक्षणाला सुरुवातही झाली आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षण पद्धतीत सायबर गुन्हे वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिक्षण ऑनलाइन झाल्याने मुलांना लहान वयातच मोबाईल, लॅपटॉप व कॉम्प्युटर जास्त प्रमाणात हाताळण्यास मिळत आहे. शाळेकडून तासिकांची येणारी लिंक पाहण्यासाठी व इतर शालेय अॅक्टिव्हिटीसाठी मुलांकडे वेगवेगळे सोशल अकाऊंट असणे आवश्यक झाले आहे. सोबतच ईमेल अकाऊंटही तयार करावे लागत आहेत. अगदी लहान वयात ही मुले सोशल प्लॅटफॉर्मवर आली आहेत आणि त्यामुळे सायबर सुरक्षेचे भान राखणे गरजेचे झाले आहे. ऑनलाइन हऱ्यासमेंट, डेटा थेफ्ट, व्हायरस अटॅक, असे प्रकार होण्याची भीती वाढली असल्याचे मत सायबर तज्ञ व्यक्त करत आहेत.