महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आजपासून बारामतीत संचारबंदी लागू - बारामतीत संचारबंदी बद्दल बातमी

आजपासून बारामतीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यावेळी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

curfew has been imposed in Baramati from today
आजपासून बारामतीत संचारबंदी लागू

By

Published : Apr 3, 2021, 7:26 PM IST

बारामती (पुणे) -कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर बारामतीत शनिवारपासून पुढील सात दिवस जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने अंशतः संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. बारामतीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक निर्बंध लावावे लागत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बारामतीत वाढती रुग्ण संख्या आटोक्यात आणण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शनिवारपासून सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंतच सर्व प्रकारचे व्यवहार सुरू राहतील. मात्र, बारामतीतील हॉटेल, मॉल, रेस्टॉरंट, बार, चित्रपटगृह, नाट्यगृह, स्विमिंगपूल, स्पा, जिम व आठवडे बाजार बंद राहतील. सकाळी ९ ते सायंकाळी ६पर्यंत जमावबंदी तर सायंकाळी ६ ते सकाळी ९पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. फळे, भाजीपाला, दूध, वृत्तपत्र सेवेसह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यवसायिकांना सूट देण्यात आली आहे. हॉटेलमधील पार्सल सेवा व लसीकरणासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना सूट देण्यात आली आहे.

तर होणार कडक कारवाई -

विविध कारखाने कार्यालये व व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, समारंभांना परवानगी असणार नाही. मात्र, विवाह सोहळा व अंत्यविधीसाठी शासनाच्या नियमाप्रमाणे लोक उपस्थित राहतील. दहावी व बारावीच्या ठरलेल्या परीक्षा सोडून शाळा व महाविद्यालय येत्या ३० एप्रिलपर्यंत बंद असतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तर शहरातील व्यापाऱ्यांनी दुकानात गर्दी केल्यास शासनाचे नियम न पाळल्यास ते दुकान बंद करणार असल्याचे बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले.

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ हजार रूपये दंड -

संचारबंदीच्या काळात बारामती शहरात ५ पोलीस अधिकारी ५० पोलीस कर्मचारी, ४० होमगार्ड यांच्या मार्फत शहरात पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. यावेळी शहरात रिक्षावर भोंगे लावून नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात येणार आहेत. त्यामध्ये मास्क न वापरल्यास, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ हजार रूपये दंड, जमावबंदी कायद्यानुसार पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास प्रत्येकी १ हजार रूपये दंड करण्यात येणार असल्याची माहिती, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details