लोणावळा ( पुणे) -ठाकरे कुटुंब आणि कोळी बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. रविवार असल्याने दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. यामुळे एकविरा देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देखील वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली असून, वाहतूक कोंडीचा फटका त्यांना बसत आहे.
सुटी असल्याने भाविक आणि पर्यटकांची गर्दी
शनिवार आणि रविवार अशा सलग दोन दिवस असलेल्या सुटीमुळे एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी कार्ला गडावर गर्दी केली आहे. आज हजारो भाविक कार्ला गडावर दाखल झाले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस व स्थानिक शर्तीचे प्रयत्न करत आहेत. मात्र वाहनांची संख्या तसेच भाविक व पर्यटकांची संख्या मोठी असल्याने सर्व रस्ते भरून गेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मंदिरात दर्शनासाठी जा, असे शासन वारंवार सांगत असले तरी कार्ला गडावर मात्र सर्व नियमांची पायमल्ली केली जात आहे.