बारामती - बारामती तालुक्यातील सुमारे ५२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून उमेदवारी अर्ज भरण्यास अवघा एक दिवस राहिल्याने इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी येथील प्रशासकीय भवनात तोबा गर्दी केली होती. बहुतांश उमेदवारांची कागदपत्रे गोळा करताना चांगलीच दमछाक झालेली पाहायला मिळाली.
उमेदवारांच्या घरातील सदस्यांची धावपळ -
तालुक्यातील सर्वच महा ई-सेवा केंद्र आणि सरकारी कार्यालयात विविध दाखले मिळविण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. कागदपत्रांची पूर्तता वेळेत करून अर्ज दाखल करण्यासाठी गावपातळीवरील नेते मंडळी, युवक कार्यकर्ते, उमेदवार आणि उमेदवारांच्या घरातील सदस्य यांची धावपळ होताना दिसून आली. अर्ज दाखल करण्याची बुधवारी दुपारी तीनपर्यंत मुदत असून बुधवारीच तालुक्यात किती अर्ज भरले आहेत, हे स्पष्ट होणार आहे. जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाचा पुरावा, बॅंकेचे खाते, घरपट्टी आणि पाणीपट्टी थकीत नसल्याचे प्रमाणपत्र यासह अन्य कागदपत्रे सादर करून हमीपत्र देणे गरजेचे आहे.