पुणे - संपूर्ण राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, येथील भिमाशंकर परिसरात पावसाच्या लपंडावामुळे येथील भात शेती संकटात आली आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असलेल्या भीमाशंकर खेड आंबेगाव जुन्नर या परिसरातील डोंगराळ भागात भात शेती हे एकमेव पीक घेतले जाते. गेल्या पंधरा दिवसांपासून येथे संततधार पाऊस सुरू आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या लपंडावामुळे भात शेती संकटात सापडली आहे. यामुळे येथील आदिवासी शेतकरी चिंतेत आहेत.
पावसाच्या लपंडावामुळे भात शेतीवर संकट - पीक
दुष्काळी संकटाचा सामना करणारा आदिवासी डोंगराळ भागातील शेतकरी हा पावसाच्या भरवशावर भात शेती करतो.
दुष्काळी संकटाचा सामना करणारा आदिवासी डोंगराळ भागातील शेतकरी हा पावसाच्या भरवशावर भात शेती करतो. या परिसरात भाताचे एकमेव पीक घेतले जाते. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर येथील आदिवासी शेतकरी आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवतो. म्हणून येथील आदिवासी शेतकऱ्यांना भात हे दिलासा देणारे पीक आहे.
मागील पंधरा दिवसांपासून भीमाशंकर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहिले. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे भातखाचरे कोरडी पडायला सुरुवात झाली आहे. पावसाचा हा लपंडाव असाच सुरू राहिला तर आदिवासी डोंगराळ भागातील भात शेती ही संकटात येण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील आदिवासी शेतकरी पावसाच्या आशेने आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.