पुणे - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने एका सराईत गुन्हेगाराला भोसरी येथून अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. त्याच्यावर वाकड, लोणावळा, चाकण पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असून आर्म ऍक्टनुसार कारवाई करण्यात आली आहे.
भोसरीत सराईत गुन्हेगार जेरबंद,जिवंत काडतूस आणि पिस्तूल जप्त - पुणे पोलीस न्यूज
पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून भोसरी एका सराईत गुन्हेगारला अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसही जप्त करण्यात आले आहे.
खंडू उर्फ के.के अशोक कालेकर (वय- 22) असे या अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. मावळ तालुक्यातील काले कॉलनी,पवनानगर येथे तो वास्तव्यास होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिट 1 चे पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लोणावळा, वाकड आणि चाकण पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा, गंभीर दुखापत असे गंभीर गुन्हे दाखल असलेला खंडू उर्फ केके हा सराईत गुन्हेगार भोसरीमधील अंकुशराव नाट्यगृह येथे असून गावठी पिस्तूल बाळगून आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी संबंधित ठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले, यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पिस्तुल आणि जिवंत 1 काडतुस मिळाले. त्याच्यावर आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लांडगे, पोलीस कर्मचारी कमले, गणेश सावंत, विशाल भोईर, नितीन खेसे यांच्या पथकाने केली आहे.