पुणे - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला व्हॉट्सअप ग्रुपच्या मदतीने गुजरातमधून अटक केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा एकने केली. रोहित ऊर्फ कालू दलपत घमंडे (वय ३० रा.गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर विविध राज्यात पाच गुन्हे दाखल आहेत. अद्याप, चार साथीदार फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रवी अमिचंद मेहता (वय ७१) हे सोने आणि चांदीचा व्यवसाय करतात. ते मूळ पंजाब येथील असून महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, गुजरात येथील सोने व्यावसायिक दुकानदाराकडे जावून सोन्याचे आणि चांदीचे दागिने विकण्याचा व्यवसाय करतात. डिसेंबर महिन्यात ते सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन सकाळी पिंपरीच्या आंबेडकर चौकातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने मेहता यांच्या हातातील बॅग हिसकावून पळ काढला. या घटनेत रवी मेहता हे जखमी झाले होते. भरदिवसा त्यांचा पाठलाग करून लुटण्यात आले होते. घटनेत सोने, चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण ७ लाख रुपयांचा ऐवज लंपास करून धूम ठोकली होती. दरम्यान हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला त्यानुसार तपास सुरू होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि फोटो 'महाराष्ट्र क्राईम डिटेक्शन' व 'नॅशनल क्राईम डिटेक्शन ग्रुप'वर पोस्ट करण्यात आला होता.
हेही वाचा -'कृत्रिम बहुमताच्या जोरावर सत्ताधारी लोकशाहीचा खून पाडतायत'