पुणे : राजस्थानच्या जयपूर शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या तयारीत असलेल्या सुफा या दहशतवादी टोळीशी संबंधित दोघांना पुणे पोलिसांनी पकडले (Terrorists Arrest Case Pune) होते. या दोन्ही 'मोस्ट वॉन्टेड' दहशतवाद्यांना कोथरुड पोलिसांनी अटक केली होती. एटीएसकडून या दोन्ही दहशतवाद्यांच्या करण्यात आलेल्या तपासणीमध्ये त्यांच्याकडे सापडलेल्या लॅपटॉप, मोबाईलमधून जवळपास 500 जीबीचा डेटा सापडला आहे. तर या दोघांकडून कुलाब्यातील छाबड हाऊसची रेकी करण्यात आली (Pune Police) असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ऑफ द रेकॉर्ड दिली (ATS on Terrorists Arrest) आहे.
ते दहशतवादी 'आयएसआयएस' प्रेरित :पुणे पोलिसांनी इम्रान युनूस खान आणि युनूस याकूब साकी या दोघांना कोथरूड येथून अटक केली होती. 30 मार्च 2022 रोजी राजस्थान पोलिसांनी एका कारमधून स्फोटके घेऊन जाताना अल्तमस पुत्र बशीर खां शेरानी याला पकडले होते. त्यानंतर हा प्रकार समोर आला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआए) या संदर्भात गुन्हा दाखल करून अनेकांना अटक केली होती; मात्र तेव्हापासून युनूस साकी, इमरान आणि फिरोज पठान हे तिघे फरार होते. 'आयएसआयएस' पासून प्रेरणा घेऊन ही संघटना काम करत आहे. यातील इमरान खान आणि युनूस साकी याला अटक केली आहे तर फिरोज पठाण हा फरार झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.