पुणे Cricket World Cup Final : जगभरात सध्या विश्वचषकाची जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच भारतानं यावर्षी अंतिम फेरीत प्रवेश केलाय यामुळं 2011 च्या विश्वचषकानंतर भारताकडं हा विश्वचषक जिंकण्याची संधी आलीय. त्यामुळं क्रिकेटप्रेमींमध्ये सुद्धा एक उत्साहाचं वातावरण आहे. प्रत्येक क्रिकेटप्रेमी आपापल्या परीनं आता भारतानं हा विश्वचषक जिंकावा यासाठी प्रार्थना करताना दिसत आहे.
कसबा गणपतीला महाआरती : पुण्यात क्रिकेटप्रेमींनी प्रसिद्ध ग्रामदेवता कसबा गणपती मंदिरात गणरायाकडं आराधना करत महाआरती केली. या महाआरती वेळी अनेक लहान मुलं सहभागी झाले होते. भारताचं विश्वचषकाचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी यावेळी देवाला साकडं घालण्यात आलंय. भारतीय टीम सध्या जोरदार शक्ती प्रदर्शन असून गोलंदाजी आणि फलंदाजीत सुद्धा अतिशय चांगलं प्रदर्शन करत आहे. क्षेत्ररक्षणाबाबत थोडीशी चिंता रोहित शर्मानं व्यक्त केली होती. परंतु, आता याचीसुद्धा तयारी भारतीय संघाकडून करण्यात येत असल्याचं दिसतंय. त्यामुळं रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतानं हा विश्वचषक आपल्या नावे करावा यासाठी ही महाआरती करण्यात आलीय.
मुंबईतही होम हवन :मुंबईतही क्रिकेटप्रेमींच्या वतीनं माधवबाग मंदिरात भारतानं विश्वचषक जिंकावा यासाठी होम-हवन करण्यात आलं. यावेळी क्रिकेटप्रेमींना भारतीय संघाची जर्सी परिधान केली होती. तसंच भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीचे मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले होते.