पुणे Cricket World Cup 2023 : यंदाच्या विश्वचषकात भारताची विजयी मोहीम सुरूच आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं आतापर्यंत 4 सामने खेळले असून सर्व सामने जिंकले आहेत. यानंतर आज धर्मशालामध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्यासाठी भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या हा अनफिट असल्यानं तो खेळणार नाही. त्याच्या जागी भारतीय संघानं खेळपट्टी पाहून मोहम्मद शामी किंवा सूर्यकुमार यादव तसंच आश्विन याची निवड करावी, असं मत 2011 साली विश्वचषकमध्ये भारतीय संघ निवडणारे बीसीसीआयचे माजी निवडकर्ते सुरेंद्र भावे यांनी दिलीय. तसंच सध्या भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ चांगल खेळत आहे. मी या दोन्ही संघांना फायनलमध्ये बघत असल्याचं भावे यांनी सांगितलं.
भारतीय संघाची कामगिरी उत्तम : विश्वचषकात न्यूझीलंड संघानं 4 सामने जिंकले आहेत. गुणतालिकेमध्ये न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकूणच आतापर्यंत भारतीय संघाची कामगिरी बाबत भावे यांना विचारलं असता ते म्हणाले की, भारतीय संघ हा खूप छान कामगिरी करत आहे. रोहित शर्माच्या कर्णधार पदाच्या कामगिरीत मला अतिशय कल्पकता दिसत आहे. सध्याचे सामने पाहिले असता भारतीय संघाची गोलंदाजी खूप चांगली होत आहे. गोलंदाज हे आपल्या फलंदाजांचं काम खूपच सोपे करत आहेत. तसंच जे खेळाडू विश्वचषक सुरू होण्याच्या आधी अनफिट होते ते आता फिट झाले आहेत. आताच्या संघाचे क्षेत्ररक्षण मागील 10 वर्षातील सर्वोत्तम आहे. संघ अप्रतिम क्षेत्ररक्षण करत असून संघासाठी 20 ते 25 धावा वाचविताना दिसत आहेत. सर्वच क्षेत्रामध्ये आतापर्यंत भारतीय संघाची कामगिरीही सुरेख सुरू आहे. तसंच या संघाकडून आपल्याला खूपच अपेक्षा असल्याचं यावेळी भावे यांनी सांगितलंय.
भारताचे पुढील तिन्ही सामने हे महत्त्वाचे आहेत. भारताचे न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका आणि इंग्लंड या संघाबरोबर सामने होणार आहेत. हे तिन्ही संघ खूपच चांगले खेळत असल्यानं हे सामने खूपच महत्त्वाचं आहेत. तसंच सामना हा अंतिम सामन्यात प्रवेश मिळविण्याच्या दृष्टीनें खूपच महत्त्वाचा सामना आहे-माजी निवडकर्ते सुरेंद्र भावे