पुणेWorld Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघाचा 19 ऑक्टोबरचा बांगलादेश विरुद्धचा सामना हा पुण्यातील 'एमसीए' स्टेडियमवर खेळला जाणार आहे. 'एमसीए'वर होणाऱ्या सर्व सामन्यांसाठी आम्ही तयार आहोत. सर्व सोयी-सुविधा स्टेडियमवर करण्यात आल्याची माहिती रोहित पवार यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली. प्रेक्षकांसाठी खास सुविधा : पुण्यातील एमसीए स्टेडियवर पाच सामने होणार आहेत. त्यासंदर्भात तयारी पूर्ण झाली आहे. हे सर्व 50 ओव्हरचे सामने असणार आहेत. उन्हात देखील हे सामने होणार असल्यानं बसण्याची व्यवस्था तसंच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता गृह आणि पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. सामना पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पूर्ण तयारी 'अपेक्स बॉडी'कडून करण्यात आली आहे. ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजे, त्या सर्व गोष्टी आम्ही केल्या असल्याचे यावेळी रोहित पवार यांनी सांगितलं.
महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट :इतर राज्यांपेक्षा जास्त सामने हे महाराष्ट्रात होणार आहेत. एकूण 10 सामने हे महाराष्ट्रात होणार आहेत. त्यापैकी 5 सामने हे पुण्यात होत आहेत, ही आपल्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. आयसीसीबरोबर पाठपुरावा हा खूपच चांगला झाला आणि त्यांनी मान ठेवत आम्हाला विश्वचषकचे पाच सामने दिले आहेत, असे यावेळी रोहित पवार म्हणाले.
युवा खेळाडूंसाठी प्रोत्साहन : गेल्या आठ महिन्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे युवा पुरुष, महिला खेळाडूंना खेळण्याची संधी जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसंच या युवा खेळाडूंचे सामने देखील वाढवण्यात आले आहेत. आता ही सुरुवात असून, येत्या काळात 'यपीएल'मध्ये देखील आपल्याला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू खेळताना पाहायला मिळणार आहेत. नक्कीच आपल्याला भारतीय संघात देखील 'एमसीए'चे खेळाडू हे खेळताना पाहायला मिळतील, असा विश्वास आम्हाला असल्याचं यावेळी रोहित पवार यांनी सांगितलं.