पुणे - कोरोना विषाणुचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. यातून सर्व व्यवसायांसह हॉटेल व्यवसाय अद्यापही पूर्वपदावर आलेला नाही. यावर पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळमधील शिवराज हॉटेल मालकाने नामी शक्कल लढवत ग्राहकांसाठी खास बुलेट थाळी बनवली आहे. यात 15 मांसाहार पदार्थ असून ते एका तासात, एका व्यक्तीने फस्त केल्यास त्या ग्राहकाला बक्षीस म्हणून नवी कोरी रॉयल इनफिल्ड बुलेट भेट म्हणून दिली जाणार आहे. अद्याप तरी ही 'बुलेट थाळी' फस्त करणारा ग्राहक शिवराज हॉटेलला भेटलेला नाही, असे हॉटेल मालक अतुल वाईकर सांगतात. बुलेट थाळीची क्रेज अवघ्या महाराष्ट्रात झाली असून हा चर्चेचा विषय बनलेला आहे. या थाळीमुळे शिवराज हॉटेलमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली आहे.
बुलेट थाळीमुळे हॉटेलमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली
कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यापासून नोकरदार आणि व्यवसायिकांचे अतोनात नुकसान झाले. कोरोना महामारीतून सावरत असताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पुणे जिल्ह्यातील शिवराज हॉटेल देखील त्यामधील एक असून कोरोनाच्या अगोदर ग्राहकांची वर्दळ हॉटेलमध्ये असायची. परंतु, कोरोनानंतरचा काळ हॉटेल चालकांसाठी खडतर जात असून ग्राहक कोरोनामुळे हॉटेलकडे पाठ फिरवत होते. ग्राहक पुन्हा हॉटेलमध्ये आणण्यासाठी हॉटेल मालक अतुल वाईकर यांना बुलेट थाळीची कल्पना सुचली. ही 15 नॉनव्हेज पदार्थ असलेली थाळी एकट्याने फस्त केल्यास त्या ग्राहकाला नवी कोरी बुलेट दिली जाणार असल्याने या हॉटेलमध्ये ग्राहकांची नेहमी पेक्षा जास्त ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. यामुळे हॉटेल मालक अतुल वाईकर यांनी समाधान व्यक्त केले असून सध्या त्यांचा व्यवसाय पूर्वपदावर आला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
पापलेट - 4 पीस, सुरमई- 4 पीस, चिकन लेग - 4 पीस, कोळंबी करी, मटण मसाला, चिकन फ्राय, कोळंबी बिर्याणी - 1, भाकरी - 4, रोटी - 4, सुकट, कोळंबी कोळीवाडा, बिस्लेरी, रायता - 1, सोलकडी - 4, रोस्टेड पापड - 4, मटण अळणी सूप - 4 वाट्या
हेही वाचा -पिंपरीत पिस्तूलच्या धाकावर तरुणीचे अपहरण; सहा तासाच्या आत आरोपीला बेड्या
हेही वाचा -भाजपमधील नगरसेवक बंड करणार नाहीत, आमच्यात गट तट नाहीत - संजय काकडे