पुणे जिल्ह्यातील तरुणाची प्रेरणादायी कहानी पुणे : देशात गेल्या काही वर्षांपासून बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून अनेक तरुण हे उच्च शिक्षण घेऊनही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. तरुणांना उच्चशिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने त्यांच्यासमोर पुढील भविष्यासाठी अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. त्यामुळे आता राज्यातील काही उच्चशिक्षित तरुण हे पुन्हा शेतीकडे वळू लागले आहेत. ते शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील अशाच एका उच्च शिक्षित तरुणाने नोकरीच्या मागे न लागता गो पालन व्यवसाय सुरू करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. त्याने 2 गाईंपासून प्रवास सुरू केला असून आता त्याच्याकडे 400 गाई झाल्या आहेत. या गाईंचे पालन करून तो महिन्याला जवळपास 10 लाख रुपयांची कमाई करतो आहे.
दोन गाईंपासून 400 गाईंपर्यंतचा प्रवास : मावळ तालुक्यातील ऋषिकेश सावंत याच्याकडे वडिलोपार्जित 2 गाई होत्या. उच्च शिक्षित तरुणांची परिस्थिती पाहून त्याने वडिलोपार्जित गाईंचा व्यवसाय पुढे नेण्याचा निर्णय घेतला आणि आज 2 गाईंपासून सुरू केलेला व्यवसाय आता 400 गाईपर्यंत पोहचवला. याबाबत ऋषिकेश सावंत याने सांगितले की, मी इतिहास विषयात पदवीधर आहे. आज उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांना रोजगारासाठी मरमर फिरावं लागतं आहे, याची मला जाणीव होती. त्यामुळे मी ठरवले मी आमचा जो वडिलोपार्जित गो शाळेचा व्यवसाय आहे तोच पुढे घेऊन जाईल. त्यानंतर मी वडिलांच्या 2 गाई असलेली गो शाळा चालवायला घेतली आणि अभ्यास करत त्यात हळूहळू वाढ केली. आज या गो शाळेत तब्बल 400 गाई झाल्या आहेत. गोशाळेत पाच प्रकारच्या गाई आहेत. यामध्ये खिल्लार, साईवाल, गीर, थरपारकर, राठी, या गाईंचा समावेश आहे.
महिन्यालासाडे पाच लाख रुपये नफा मिळतो : तो पुढे म्हणाला की, ही गो शाळा सांभाळत असताना पहाटे 3.30 च्या सुमारास उठून कामाला सुरुवात करावी लागते. पहिले गाईचे शेण काढून गोठा स्वच्छ केला जातो आणि मग गोठ्यात जंतू होऊ नये म्हणून लिंबाचा पाला, कापूर, गोवारी, टाकून निर्जंतुक धूर केला जातो. हे केल्याने गाईंना माशा गोचीड लागून ते आजारी पडत नाहीत. या नंतर गाईंना आंघोळ घातली जाते आणि मग त्यांना खाण्यासाठी उसाची कुट्टी, सरकी ढेप दिली जाते. आज जरी गो शाळेत 400 गाई असल्या तरी या गाईंमध्ये 120 ते 150 गाई हे दूध देतात. त्या दिवसाला साधारणत: 600 लिटर दूध देतात. हे दूध चांगल्या भावाने मुंबईला पाठवले जाते. यातून महिन्याला 9 ते 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. झालेल्या उत्पन्नातून कामगारांचा पगार, गाईचं वैरण, औषध यासाठी साधारण 3 लाख रुपये खर्च होतो. सर्व काही जाऊन महिन्याला 5 ते साडे 5 लाख रुपये नफा मिळत असल्याचं यावेळी ऋषिकेश सावंत याने सांगितलं.
गाईंना कत्तलखान्यात न पाठवता दफन केले जाते : त्याच्या या व्यवसायाबाबत वडील शांताराम सावंत यांनी सांगितले की, आजकाल हाय सोसायटीतील मुलं उच्चशिक्षिण घेऊन नोकरीच्या मागे लागतात. घरी शेती असताना ही मुले गांव सोडून शहराकडे येतात आणि मग शहरातूनच शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करावा अस सांगतात. आज देशभरात असंख्य पदवीधर युवक पदव्या घेऊन फिरत आहे. या सर्वांनी आपली वडिलोपार्जित शेती केली किंवा शेळीपालन, गोपालन असा व्यवसाय केला तर नक्कीच नोकरीपेक्षा व्यवसाय बरा असं हे युवक म्हटल्याशिवाय राहणार नाहीत. ते पुढे म्हणाले की, आज आपण पाहिलं तर गाई म्हातारी झाली तर ती गाई कसाई किंवा कत्तलखाना येथे विकली जाते. पण आम्ही आमच्या कोणतीही गाय विकत नाही. याच मुख्य कारण म्हणजे याच गाई आपल्याला दूध, शेण, गोमूत्र देतात. मग ह्या गाई म्हाताऱ्या झाल्यावर त्यांना विकायचं कसं? त्यामुळे ज्या गाई मृत्यूमुखी पडतात त्या गाईंना आम्ही आमच्याच गो शाळेत विधिवत पूजा करून दफन करतो. आतापर्यंत जवळपास 70 गाईंवर अशाप्रकारे अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. त्यासाठी 1 एकर जमीन राखून ठेवली असल्याचे वडील शांताराम यांनी सांगितले.
हेही वाचा :Atal Aahar Yojana Scam : अटल आहार योजनेत महाघोटाळा; गावाच्या लोकसंख्येपेक्षा लाभार्थींची संख्या अधिक दाखवली