पुणे - शहरात कोरोनामुळे गेल्या महिन्याभरापासून दिवसात दररोज 80 ते 90 मृत्यू होत आहेत. या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासनाने आता व्हाईट कोल (पांढरा कोळसा) चा वापर करण्यास परवानगी दिली आहे. याद्वारे मोठ्या प्रमाणात आता अंत्यसंस्कार केले जात आहेत.
पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा प्रमाणात वाढला आहे. यात दररोज अनेकांचा मृत्यू होत आहे. या मृतदेहांवर कैलास स्मशानभूमी, येरवडा स्मशान भूमी, वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जात आहेत. तसेच उपनगरातल्या स्मशानभूमीत देखील कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. सुरुवातीला मृत्यूची संख्या कमी असल्याने विद्युत दाहिनी आणि गॅस दाहिनीवर अंत्यसंस्कार होत होते. मात्र जसजसे कोरोनामुळे होणारे मृत्यू वाढले तसे जाळून अंत्यसंस्कार करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
वाढत्या मृत्यूमुळे अंत्यसंस्काराला वेळ
एका मृत देहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी साधारणपणे सहा मण म्हणजे 240 किलो लाकडे लागतात आणि 300 गवऱ्या लागतात. त्यामुळे दिवसाला साधारण पणे 150 ते 200 मण लाकूड हे लागत आहे. त्यात लाकूड विक्रेत्यांनी लाकडाचे भाव वाढवले होते. एका अंत्यसंस्काराच्या लाकडांसाठी सहा ते सात हजार घेतले जात होते. त्यामुळे आता प्रशासनाने अंत्यसंस्कारसाठी 'व्हाईट कोल'(पांढरा कोळसा) वापरण्याचा निर्णय घेतला.