बारामती (पुणे) - कोरानाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने बारामती प्रशासनाने आता कडक पावले उचलली असून, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई व कोरोना तपासणी केली जात आहे. या तपासणीत पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या नागरिकाला रुग्णालयात दाखल करण्यात येत आहेत.
बारामती शहरातील तीन हत्ती चौकात विनाकारण फिरणाऱ्या ५८ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बारामतीत आरोग्य विभागामार्फत रुग्णवाहिकेतून डॉक्टरांची टीम मोकाट फिरणाऱ्यांची तपासणी करीत आहे, अशी माहिती बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.
बारामतीत अवघ्या दोन दिवसात तब्बल ७८५ रुग्णांची भर पडली आहे. या रुग्ण संख्येमुळे बारामतीत आत्तापर्यंत एकूण १५ हजार १६१ रुग्ण संख्या झाली आहेत. तर आतापर्यंत पैकी ११ हजार ३४६ कोरोना रुग्णांनी यशस्वी मात केली आहे. सर २५७ रूग्ण आत्तापर्यंत दगावले आहेत.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सुरुवातीला कडक निर्बंध घालत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व स्थापने बंद ठेवण्यात आले. मात्र, तरीही विनाकारण रस्त्यावर फिरणे, ठिकठिकाणी गर्दी करणे असे प्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यावरुन व निर्बंध घालूनही रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला.