बारामती- शहरातील वाढती रुग्ण संख्या नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढवणारी ठरत आहे. बारामतीतील रुग्णसंख्येने आता तीनशेचा टप्पा पार केला आहे. वाढती रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी सुपर स्प्रेडरचा नेमकेपणाने शोध घेण्याची गरज आहे. काल (शनिवारी) झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गाव निहाय सुपर स्प्रेडरची यादी करावी, कॉन्टॅक्ट ड्रेसिंग वाढवावे, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
अनेक रुग्ण हे लक्षणे विरहित व सौम्य लक्षणे असणारे
बारामती शहर व तालुक्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमित रुग्ण आढळून येत आहेत. काल शनिवारी घेतलेल्या ९२२ नमुन्यांपैकी २१६ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३४४ नमुने प्रतीक्षेत आहेत. बारामतीत आतापर्यंत ११ हजार ७३५ एवढी रुग्ण संख्या झाली असून ९ हजार ३३५ रुग्ण बरे झाले आहेत. वाढती रुग्ण संख्या चिंता वाढवणारी असतानाच सुपर स्प्रेडर शोधण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. रूग्ण संख्येमध्ये अनेक रुग्ण हे लक्षणे विरहित व सौम्य लक्षणे असणारे आढळून येत आहे.