पुणे -कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे मौल्यवान साहित्य चोरीला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी-चिंचवडच्या नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये अशा प्रकारच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्याजवळ असणाऱ्या मौल्यवान वस्तू नातेवाईकांना मिळत नसल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणात वैष्णवी ज्योतिबा खुळे (वय 20, रा. पिंपळे निलख) या तरुणीने तक्रार दिली आहे. तीचे मामा प्रशांत विश्वनाथ मोरे (वय 40, मरकळ रोड, आळंदी) यांना कोरोनाची लागण झाल्याने 25 एप्रिल रोजी नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना मोरे यांचा 1 मे रोजी मृत्यू झाला. त्यानंतर मोरे यांच्यासोबत असलेला मोबाईल फोन त्यांच्या नातेवाईकांना मिळाला नाही. त्यानंतर नातेवाईकांनी तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात मोबाईल फोन चोरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.